लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून परत येत असताना वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन बाजूला असलेल्या खाणीच्या पाण्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये कारचालक अविनाश अनिल मेश्राम (वय २३, रा. रक्षा कॉलनी गिट्टीखदान) आणि अविनाश पटाळे (वय २६, रा. सुरेंद्रगड मशिदीजवळ) या दोघांचा समावेश आहे. तर, रजत रवींद्र कानफाडे (वय २३, रा. हजारी पहाड), मनीष विरेंद्र शर्मा (वय २६, रा. जेएसडब्ल्यू कॉलनी कळमेश्वर) आणि बाबा ठाकूर (वय २४, रा. सेमिनरी हिल्स सुरेंद्रगड) अशी जखमींची नावे आहेत.मनीष शर्माच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मनीष, अविनाश, रजत, बाबा हे सर्व क्रूझरमध्ये (एमएच ३१/ डीएन ९९९०) बसून अमरावती मार्गावरील गोंडखैरीच्या एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते. शनिवारी मध्यरात्री ते तेथून खाणेपिणे आटोपून नागपूरकडे परत यायला निघाले. कार अविनाश मेश्राम चालवित होता. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. स्काय रोज हॉटेलच्या वळणाजवळ वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन थेट टेकड्यावर चढली आणि तेथून ती उलटी होत टेकड्याच्या बाजुला असलेल्या खाणीच्या पाण्यात पडली. त्यामुळे कारमधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले. अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील मंडळी तिकडे धावली. त्यांनी जखमींना पाण्याबाहेर काढले. तर, एकाने वाडी पोलिसांना कळविले. त्यानुसार, पीएसआय एस. एस. कावनपूरे आपल्या सहका-यांसह तिकडे पोहचले. त्यांनी जखमींना वाडीच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी काही वेळेतच अविनाश मेश्राम आणि अविनाश पटाळेला मृत घोषित केले.स्वप्नील नरेंद्र गायधने (वय २४) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.वेगाशी स्पर्धा नडलीया अपघाताला कारचालक अविनाश मेश्रामचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे जखमींच्या बयाणावरून स्पष्ट झाल्याचे पोलीस सांगतात. कार वाऱ्याच्या वेगाने होती. त्याचमुळे ती वळणावर अनियंत्रित झाल्याने थेट टेकड्यावर चढली अन् तेथून पलट्या घेत खाली खदानीच्या पाण्यात आली.
अमरावती-नागपूर महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 3:07 PM
मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून परत येत असताना वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन बाजूला असलेल्या खाणीच्या पाण्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.
ठळक मुद्देवाढदिवसाची पार्टी जीवावर बेतलीतीन गंभीर जखमी वाडीत गुन्हा दाखल