नागपूर : चालकाला समाेर राेडलगत उभा असलेला नादुरुस्त ट्रक व्यवस्थित न दिसल्याने वेगात जाणारी कार त्या ट्रकवर मागून जाेरात आदळली. यात कारमधील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. कारमधील सर्व जण आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-बुटीबाेरी राष्ट्रीय महामार्गावरील डाेंगरगाव परिसरात गुरुवारी (दि. २३) पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
श्रीनिवास राव उंडवल्ली (४८) असे मृताचे तर सूर्यकिरण श्रीनिवास राव उंडवल्ली (४८), श्रीदेवी श्रीनिवास राव उंडवल्ली (३८), नाग लक्ष्मीदास रेड्डी (३८), दास रेड्डी मासरेय्या (६५), नलमूर्ती सचवाणी (४०), डोंगा शिवा (३८) व लक्ष्मी नीना बंडी (४५), अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण आंध्र प्रदेशातील निदादावाेलू, जिल्हा गाेदावरी वेस्ट येथील रहिवासी आहेत.
ते सर्व जण त्यांच्या एपी-३७/बीझेड-२२२६ क्रमांकाच्या कारने वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून नागपूर मार्गे आंध्र प्रदेशात जात हाेते. ते नागपूर ओलांडून डाेंगरगाव परिसरात पाेहाेचताच कारचालकास समाेर राेडलगत उभा असलेला पीबी-०४/यू-०६१६ क्रमांकाचा नादुरुस्त ट्रक व्यवस्थित दिसला नाही. ट्रक जवळ येताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार त्या ट्रकच्या मागच्या भागावर जाेरात आदळली. यात कारमधील आठही जण गंभीर जखमी झाले. त्यातच श्रीनिवास राव उंडवल्ली यांचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना कारमधून बाहेर काढले व उपचारासाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. श्रीनिवास राव उंडवल्ली यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
झाेपेच्या डुलकीची शक्यता
हा अपघात पहाटेच्या वेळी झाला. पहाटे सहसा वाहनचालकांना झाेपेची डुलकी येण्याची शक्यता असते. कारचालकालाही झाेपेची डुलकी आली असावी. त्यामुळे त्याला समाेर उभा असलेला ट्रक व्यवस्थित दिसला नसावा. शिवाय, ट्रकचालकानेही ट्रक राेडलगत उभा करतेवेळी काेणत्याही सुरक्षात्मक उपाययाेजना केल्या नव्हत्या.