नागपूर :समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीकडे जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने बॅरीकेट्सला जोरदार धडक दिली. याच मार्गावर तपासणीसाठी असलेल्या वर्धा आरटीआचा वायुवेग पथकाने तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याने दोन लहान मुलांसह, दोन महिला व दोन पुरुष बचावले.
प्राप्त माहितीनुसार, ‘एमएच०४जीई०७३५’ मा क्रमांकाची कार गुरुवारी समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीकडे जाण्यासाठी निघाली. समृद्धी महामार्गावरील चॅनेज ७०, येळकेली ते पूलगाव या दरम्यान कारचा टायर फुटून बॅरीकेट्सला जोरदार धडक दिली. यामुळे कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. टाकी फुटून आॅईल रस्त्यावर पसरले. आग लागण्याचा धोका होता. याच मार्गावर वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) वायुवेग पथक वाहन तपासणीसाठी तैनात होते. त्यांनी लागलीच अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. प्रवाशांनाबाहेर काढले. यात दोन लहान मुलांसह, दोन महिला व दोन पुरुष होते.
टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’
पथकाने टोल फ्री क्रमांकाला याची माहिती देताच रुग्णवाहिका व टोर्इंग व्हॅन आले. अपघातग्रस्त वाहनाला रस्त्याच्या बाजूला करून दुसरा अपघात होण्यास टाळता आले. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहचविण्यात आले. वायुवेग पथकात मोटार वाहन निरीक्षक तुषारी बोबडे, विशाल मोरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अनुराग सालनकर, पांडुरंग वाघमारे आदींचा समावेश होता. पथकाने केलेल्या कार्याचे नागपूर शहर आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी कौतुक केले.
- समृद्धीवर येताना टायर तपासून घ्या
वर्धेचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले, समृद्धी महामार्गावर येताना वाहन व टायर तपासूनच यावे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने टायरमधील हवा प्रसरण पावते व ती गरम होऊन टायर फुटण्याचा धोका असतो. यामुळे शक्य असल्यास नायट्रोजशन हवा भरावी व ती कमी भरावी. यामुळे धोका टाळता येईल. अपघात झाल्यास किंवा मदत हवी असल्यास या ‘८१८१८१८१५५’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.