नरेश डोंगरे नागपूर : नुकसान भरपाईची रक्कम मागण्यासाठी समोर आलेली इन्शुरन्स पॉलिसी अधिकाऱ्यांनी बघितली अन् त्यांना धक्काच बसला. दाव्याच्या माध्यमातून लाखोंची रक्कम मागणाऱ्या आरोपीने इन्शुरन्स कंपनीची कागदपत्रे हुबेहुब दिसत असली तरी ती बनावट होती. त्यावरचे कंपनीचे शिक्के (ठप्पे) अन् अधिकाऱ्यांच्या सह्यासुद्धा बोगस होत्या. त्यामुळे चक्रावलेले अधिकारी पुण्याहून थेट नागपूरात पोहचले आणि बनावट इन्शुरन्स पॉलिसी तयार करून रक्कम उकळण्याचा प्रकार उजेडात आला.
प्रकरण नागपूर आणि पुण्याशी जुळलेले आहे. पाचपावलीतील लष्करीबागेत आरोपी महेंद्र मंडपे राहतो. तो वाहतूक व्यावसायिक आहे. त्याने इंडिगो कार एमएच ४९/एफ ०४८९ची१६ एप्रिल २०१७ ला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी बनविली. तब्बल सहा वर्षे म्हणजेच एप्रिल २०२३ पर्यंत ही पॉलिसी चालली. दरम्यान, कारला अपघात झाल्यानंतर क्लेम मिळावा म्हणून मोटर अपघात प्राधिकरणाकडे दावा केला. त्यानुसार, प्राधिकरणाने कंपनीच्या मुख्यालयाकडे या संबंधाने कागदपत्रे पाठविली.
पुण्याच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासली. ती 'द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' सारखीच दिसत होती. त्याखाली मारलेले शिक्के मात्र काहीसे वेगळे होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्यासुद्धा बनावट वाटत होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला. परिणामी कसून तपासणी करण्यात आली अन् ती संपूर्ण पॉलिसीच बनावट असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. कंपनीच्या नावाचा गैरवापर करून इतरांसह कंपनीचीही फसवणूक करण्याचा डाव आरोपी मंडपेने टाकल्याचे स्पष्ट झाल्यामुळे कंपनी अधिकारी नागपुरात पोहचले. त्यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूकीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
आरोपी सराईत असावाज्या पद्धतीने ही कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यावरून आरोपी सराईत असावा किंवा पॉलीसी बनवून देणारे सराईत गुन्हेगार असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.