लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : रस्त्यात अचानक नीलगाय आडवी आल्याने अनियंत्रित झालेली कार मार्गालगतच्या झाडावर धडकली. त्यात कारचालक गंभीर जखमी झाला. काही क्षणातच अपघातग्रस्त कारने पेट घेतला आणि कार पूर्णत: जळून खाक झाली. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव-कातलाबाेडी मार्गावर मंगळवारी (दि.१६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
मुकेश यादव (३२, रा. फ्रेंड्स काॅलनी) असे जखमी कारचालकाचे नाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एमएच-३१/एफजे-४१४९ क्रमांकाच्या कारने मुकेश यादव व शुभम चंदनकर (२७, रा. वाडी) हे दाेघेही साहिल यादव यांच्या कातलाबाेडी लगतचे ले-आऊट साईड पाहण्यासाठी आले हाेते. मुकेश यादव यांच्या ले-आऊटचे स्वागतद्वार तयार करण्याचा व्यवसाय असल्याचे समजते.
दरम्यान, ले-आऊट पाहून परत जात असताना, स्टार टी-पाॅइंट रिसाेर्टसमाेर अचानक कारसमाेर नीलगाय आडवी आली. तिला वाचविण्यासाठी कारचालक मुकेश यांनी ब्रेक लावल्याने अनियंत्रित झालेली कार मार्गालगतच्या झाडावर जाेरात आदळली व कार मागे फिरली. एअर बॅग उघडल्याने कारमधील मुकेश व शुभम बचावले. मात्र मुकेशच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ताे कारमध्ये अडकला. काही क्षणातच कारने पेट घेतला. लागलीच शुभमने शर्थीचे प्रयत्न करीत जखमी मुकेशला बाहेर काढले. आगीचा भडका उडाल्याने कार जळून खाक झाली. जखमी मुकेशला वाडीतील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.