नागपूर : सदर उड्डाणपुलावर अनियंत्रित कार रोड दुभाजकाला धडकून उलटली. बुधवारी दुपारी घडलेल्या या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
दुपारी २ वाजता कार क्रमांक एम.एच. ३१-ई.यू.-०१४० सदर उड्डाणपुलावरून कस्तूरचंद पार्ककडे जात होती. उड्डाणपुलावरून खाली उतरताना कार अनियंत्रित झाली. भरधाव वेगाने असलेली कार रोड डिव्हायडरला धडकून उलटली. कारमध्ये निखिल राजेंद्र केदार, रा. बजाजनगर व त्याचा मित्र होता. दोघांना किरकोळ जखम झाली. अपघाताची माहिती हाेताच सदर व वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने कारला रस्त्यातून हटवण्यात आले. कारच्या धडकेमुळे रोड डिव्हायडरही क्षतिग्रस्त झाले.
----------------------
पिता-पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
नागपूर : सिमेंट पॅनलचे काम करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल अग्रवाल (५२) रा. कृष्ण अर्पण कॉलनी अमरावती व त्यांचा मुलगा तेजस अग्रवाल (२५) अशी आरोपींची नावे आहेत. माधवनगरी, एमआयडीसी येथील नीलेश अग्रवाल हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन व निवास उपलब्ध करून देतात. १३ फेब्रुवारी राेजी त्यांची रेल्वेने झांशीला जात असताना अनिल अग्रवालसोबत भेट झाली. अनिल अग्रवालने स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगितले. नंतर दोघेही सोबतच नागपूरला परत आले. स्टेशनवर अनिलने त्यांचा मुलगा तेजससोबतही नीलेश यांची ओळख करून दिली. तेजसचे सिमेंट पॅनलचे काम असल्याचे सांगितले. नीलेश यांनी तेजसला वॉल कंपाऊाडचे काम दिले. त्यांनी तेजसला २.२१ लाख रुपयेसुद्धा दिले. यानंतर तेजसने काम केले नाही. नीलेश अग्रवाल यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
-------------------------