नागपूर, दि.7 - मर्यादेपेक्षा जास्त वेगात धावणारी कार चालकाने अचानक वळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती कार फुटाळा रस्त्यावरून उडून अगदी तलावाच्या काठावर उलटी झाली. या अपघातात कारमधील तरुणांना दुखापत झाली. मात्र, कार सुरक्षा भींतीला अडकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. फुटाळा तलावाच्या चौपाटीवर सोमवारी सकाळी हा सिनेस्टाईल अपघात घडला.
ऋषभ महेंद्र म्हैसकर (वय २२) हा तरुण अतिशय वेगात कार (एमएच ४०/ बीई ४५९७) चालवत होता. बाजुच्या सीटवर विशेष अरविंद भाजीपाले (वय २०) बसून होता. अमरावती मार्गाने आलेली ही कार फुटाळा वस्तीकडे शिरली. तलावाचा मार्ग येऊनही कारचालकाने वेग कमी करण्याऐवजी त्याच वेगात चौपाटीकडे कार वळवली. त्यामुळे कार अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या बाजुच्या भींतीला धडक देत हवेत उडली आणि सरळ तलावाच्या सुरक्षा भींतीवर उलटी होऊन आदळली. म्हैसकर आणि भाजीपाले या दोन्ही तरुणांचे नशिब बलवत्तर होते. त्यामुळे कार तलावाच्या काठावर अडली. अन्यथा एक मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान, हवेत उडून सिनेमातील दृष्याप्रमाणे ही कार भींतीवर आदळल्याने मोठा आवाज आला. त्यामुळे फिरायला निघालेल्या नागरिकांसह बाजुच्या वस्तीतील मंडळींनीही तिकडे धाव घेतली. अंबाझरी पोलिसांनाही नागरिकांनी कळविले. अपघात तसेच कारची अवस्था अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. लगेच मदत मिळाल्याने कारमधील म्हैसकर आणि भाजीपाले या दोघांना सुखरूप बाहेर पडता आले. त्यांना जखमा झाल्या होत्या. त्यामुळे रवीनगर चौकातील रुग्णालयात नेण्यात आले.
क्रेन आणून उचलली कार ...
पोलिसांनी ही कार तलावात पडू नये म्हणून तेथे मोठी क्रेन बोलवून घेतली. क्रेनच्या मदतीने कार सरळ करून उचलून रस्त्यावर आणण्यात आली. या संबंधाने वारंवार विचारणा करूनही अंबाझरी पोलिसांकडून केवळ गुन्हा दाखल व्हायचा आहे. एवढीच माहिती मिळत होती. विशेष म्हणजे, अशाच प्रकारे वेगात असलेली कार सदर पोलीस ठाण्याजवळ एका झाडावर आदळल्याने कारमधील दोन तरुणाचा गेल्या महिन्यात करुण अंत झाला होता.