वायुसेना कॅप्टन असल्याची बतावणी : हॉटेलच्या चालकाला दिला गुंगारा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वायुसेना अधिकारी असल्याची बतावणी करून दोघांनी तुली इम्पेरियल हॉटेलच्या चालकाला गुंगारा देऊन इनोव्हा कार पळवून नेली. शनिवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला. भारत मोतीराम राऊत (वय ४१) हे तुली इम्पेरियल हॉटेलमध्ये कारचालकाची नोकरी करतात. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांना हॉटेल प्रशासनाने रेल्वेस्थानकावर जाण्यास सांगितले. तेथून त्यांना वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन संतोष कुमार यांना हॉटेलमध्ये घेऊन यायचे होते. त्यानुसार, हॉटेलची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीए ३१८६) घेऊन ते रेल्वेस्थानकावर गेले. स्थानकासमोरच्या पार्किंगमध्ये राऊत कार घेऊन थांबले असताना त्यांच्याजवळ दोन तरुण आले. स्वत:ची ओळख देताना त्यांनी आपण कॅप्टन संतोष कुमार असल्याचे सांगून कार काढण्यास सांगितले. राऊत त्या दोघांना कारमध्ये बसवून हॉटेलकडे आणत असताना बजाजनगरातील एका वाईन शॉपसमोर आरोपींनी कार थांबवण्यास सांगितले. कारचालक राऊत यांना पैसे देऊन त्यांना आरोपींनी वाईन आणण्यास पाठविले. राऊत वाईन शॉपमध्ये गेले. तेथून परत येण्यापूर्वीच आरोपींनी कार पळवून नेली. या प्रकारामुळे गोंधळलेल्या राऊत यांनी हॉटेल प्रशासनाला ही माहिती दिली. त्यानंतर बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.त्यांना कसे कळलेही कार कॅप्टन संतोष कुमार यांना घ्यायला थांबली आहे, हे आरोपींना कसे कळले, असा प्रश्न पोलिसांसकट साऱ्यांनाच पडला आहे. कार आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामी लागली आहे.
तोतया अधिकाऱ्याने पळविली कार
By admin | Published: July 17, 2017 2:53 AM