कार फेअरडीलवाल्याचीच : आरोपीला अद्याप अटक नाहीनागपूर : बेदरकारपणे कार चालवून फूटपाथवर झोपणाऱ्या गरीब दाम्पत्याला चिरडणारी फेअरडीलच्या मालकाची कार (एमएच ३१/ ईए ७७७८) धंतोली पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. मात्र, आरोपी जीवन शिवनानी याला ७२ तास होऊनही धंतोली पोलिसांनी अटक केलेली नाही. शनिवारी रात्री यशवंत स्टेडियममधील फेअरडील शोरूम समोरच्या फूटपाथवर शंका रूपेश कळंबे (वय २६) आणि तिचा पती रूपेश (वय २८) हे दाम्पत्य झोपले होते. रात्री ९.३० ते १० च्या सुमारास कारचालक जीवन शिवनानी याने धोकादायक पद्धतीने वेगात कार चालवून कळंबे दाम्पत्याला चिरडले. या अपघाताने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. ते पाहून आरोपी कारचालक पळून गेला. अपघातानंतर जखमी दाम्पत्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे शंका हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रूपेश कळंबेवर उपचार सुरू आहेत. हा अपघात बघणाऱ्यांनी तसेच रूपेशने धंतोली पोलिसांना आरोपी कारचालकाचे नाव सांगितले. तो फेअरडीलचा मालक असल्याचे सांगितले. पोलिसांना कारचा रंग, क्रमांक मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला. मात्र, नमूद कारच्या मालकाने प्रारंभी अपघात झाल्याचा इन्कार केला. पोलिसांनीही मवाळ भूमिका घेतल्याने अपघाताला कारणीभूत असलेल्या आरोपीला अभय मिळाले. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच पोलीस सक्रिय झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या बयानाच्या आधारे अपघात करणारी कार जप्त केली. आरोपीला मात्र अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस चौकशी करीत असून, आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे ठाणेदार राजन माने यांनी लोकमतला सांगितले.(प्रतिनिधी)
दाम्पत्याला चिरडणारी कार जप्त
By admin | Published: November 02, 2016 2:46 AM