नागपूर : दारुचे व्यसन भागविण्यासाठी वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला आणि चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्याला पाचपावली पोलिसांनी अटक करून ४ दुचाकी व एका वाहनाच्या स्पेअरपार्टसह २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
समीर पठाण उर्फ सुरेश सकुर पठाण (२५, रा. यादवचा तबेला, कपिलनगर टेकानाका) असे वाहनचोराचे नाव आहे. तर अमीर खान कादर खान (३२, रा. पाण्याच्या टाकीजवळ, महेंद्रनगर) असे चोरीचे वाहन खरेदी करणाºया व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी १५ जूनला रात्री ९.४५ वाजता पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागर शंकरलाल तेलघरे (६५, रा. नाईकवाडी, बांगलादेश) यांनी आपली १५ हजार रुपये किमतीची लाल रंगाची हिरो प्लेझर मोपेड क्रमांक एम. एच. ३१, डी. ए-७०२० टेकानाका टी पॉईंट येथील आनंद प्रल्हाद लॉनच्या पार्किंगमध्ये उभी करून हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
त्यांची मोपेड अज्ञात आरोपीने चोरून नेल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी समीरला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेली दुचाकी अमीर खान याला विकल्याचे सांगितले. यासोबतच आरोपी समीर पठाण याने यशोधरानगर, जरीपटका, कपिलनगर ठाण्याच्या हद्दीतून ५ वाहने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४ दुचाकी व एका वाहनाचे स्पेअर पार्ट असा एकुण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत, सहायक पोलिस निरीक्षक सोमवंशी, हवालदार दिलीप पवार, प्रकाश पठाण, वासुदेव जयपूरकर, छगन शिंगणे, अंकुश राठोड, गणेश ठाकरे, हितेश फरकुंडे, महेंद्र शेलोकर यांनी केली.