सुमेध वाघमारे
नागपूर : हृदयरोग असलेल्या ३८१ बालकांवर किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ही योजना पूर्व विदर्भातील बालकांसाठी नवसंजीवनीच ठरली आहे. विशेष म्हणजे, गुंतागुंतीच्या हृदयविकारांवर राज्याबाहेर जाऊनही शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अंगणवाडी व शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम एप्रिल २०१३ पासून राबविला जातो. ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार केले जातात. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात हृदयविकाराच्या ४१५ बालकांची नोंद झाली. यातील ३८१ म्हणजे ९२ टक्के बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील बहुतांश बालके आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कष्टकरी कुटुंबांतील आहेत.
- अशी राबवली जाते योजना
प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात; तर गंभीर आजारांचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.
- नागपूर जिल्ह्यातील १५७ बालकांवर हृदयशस्त्रक्रिया
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत सहा जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील १६३ बालकांची हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड झाली. यातील ९६ टक्के म्हणजे १५७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून निवड झालेल्या ६५ बालकांवर, तर वर्धा जिल्ह्यातून निवड झालेल्या ३९ बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या. या दोन्ही जिल्ह्यांना शस्त्रक्रियेचे १०० टक्के लक्ष्य गाठता आले. भंडारा जिल्ह्यातील ३३ पैकी ३२ बालकांवर, चंद्रपूर जिल्ह्यातील ५५ पैकी ५० बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या. सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यात ६० पैकी केवळ ३८ बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या.
-३३ रुग्णालयांत शस्त्रक्रिया
मागील शैक्षणिक वर्षात सहा जिल्ह्यांतील ३८१ बालकांवर ३३ रुग्णालयांत हृदयशस्त्रक्रिया झाल्या. यात वर्धा सावंगी मेघे हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक १७२ शस्त्रक्रिया झाल्या. नागपूर बाहेर सत्यसाई हॉस्पिटल, रायपूर येथे २८, सत्यसाई हॉस्पिटल, मुंबई येथे ७, कोकिळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथे ३, एसआरसीसी, मुंबई येथे ७, तर ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई, रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई, हार्ट हॉस्पिटल, बंगरुळू येथील व फोर्टिस हॉस्पिटल, चंदीगड येथे प्रत्येकी एक शस्त्रक्रिया झाली.
- उर्वरित ३४ बालकांवर लवकरच हृदयशस्त्रक्रिया (फोटो घ्यावा)
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमामधून ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते, त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. गेल्या शैक्षणिक वर्षात नागपूर विभागातील ४१५ पैकी ३८१ विद्यार्थ्यांवर या योजनेतून हृदयशस्त्रक्रिया झाल्या. उर्वरित ३४ बालकांवर लवकरच शस्त्रक्रियेचे नियोजन केले जात आहे.
- डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर
जिल्हा : हृदयशस्त्रक्रियेचे बालक : झालेल्या शस्त्रक्रिया
नागपूर : १६३ : १५७
गोंदिया : ६५ : ६५
गडचिरोली : ६० : ३८
चंद्रपूर : ५५ : ५०
वर्धा : ३९ : ३९
भंडारा : ३३ : ३२