सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : गरीब रुग्णांच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत वाढ नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘सीव्हीटीएस’ विभागात आठवड्यातून केवळ चारच हृदय शस्त्रक्रिया होतात. परिणामी, हृदयशल्यक्रियेच्या रुग्णांवर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेची वेळ आली आहे. असे असताना, मंगळवारी निवासी डॉक्टर नसल्याच्या कारणावरून शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. याचा फटका गरीब रुग्णांना बसला असून त्यांच्या प्रतीक्षेत आणखी एक दिवसाची वाढ झाली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, तेलंगाणा, मध्य प्रदेश येथून रुग्ण येतात. सर्वाधिक रुग्णांची गर्दी ही ‘कार्डिओव्हस्कुलर अॅण्ड थोरॅसीस सर्जरी’ (सीव्हीटीएस) या विभागात असते. सध्या या विभागाचा ३० खाटांचा वॉर्ड रुग्णाने फुल्ल आहे. वरिष्ठ डॉक्टरांची संख्या कमी असल्याने एक दिवस बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया केली जाते. तर शनिवारी कामाचे नियोजन होत असल्याने आठवड्यातून दोनच दिवस दोन-दोन हृदयशल्यक्रिया होतात. यातही ज्या रुग्णांना तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना प्राधान्य दिले जाते. यामुळे सामान्य रुग्णावर शस्त्रक्रियेसाठी एक महिन्यांची प्रतीक्षेची वेळ आली आहे. या शिवाय मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ‘सीव्हीटीएस’विभागाचे शस्त्रक्रिया गृह वापरले जात असल्याने दोन दिवस हृदयशस्त्रक्रियाही बंद असतात. परिणामी, दिवसेंदिवस शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेची यादी फुगतच चालली आहे. त्यात मंगळवारी मेडिकलने निवासी डॉक्टर न पाठविल्याने शस्त्रक्रिया झाल्याच नाही. सूत्रानुसार, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या देखभालीची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर असते. मेडिकल प्रशासन यासाठी चार निवासी डॉक्टर उपलब्ध करून देते. परंतु मंगळवारी हे डॉक्टरच न आल्याने वेळेवर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सीव्हीटीएस’विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सतीश दास यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, अनेक वरिष्ठांना याची माहितीच नसल्याचेही पुढे आले आहे.(प्रतिनिधी)
हृदयशस्त्रक्रिया रद्द
By admin | Published: March 08, 2017 2:38 AM