नागपूर : केअर टेकरचे काम करणाऱ्या युवकाने सव्वालाख रुपयाच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. फ्रेण्डस कॉलनी निवासी रोहित सिंह यांचे काका ६८ वर्षीय वीरेंद्र प्रताप सिंह यांनी भावेश सुरेश दुबे (२३, रा. फिरोजाबाद, उ.प्र.) याला केअर टेकर म्हणून आपल्याकडे ठेवले होते. वीरेंद्र सिंह दहा दिवसासाठी रोहितकडे आले होते. त्यांच्यासोबत केअर टेकर भावेशही होता. २५ ते २६ डिसेंबरदरम्यान भावेशने वीरेंद्र प्रताप सिंह यांच्या खोलीतून आठ हजार रुपये व सव्वालाख रुपयाचे दागिने चोरले. रोहितच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचे प्रकरण नोंदविले आहे.
* १२.३० लाखाचा माल चोरी
नागपूर : कोराडी येथे विद्युत खांबासह १२.३० लाख रुपये किमतीचा माल चोरी गेला आहे. उप्पलवाडी रेल्वे क्रासिंग ते वठा सब-स्टेशनदरम्यान विद्युत खांब, तार आणि केबल ठेवले होते. १८ डिसेंबरला ३२ खांबांसह १२.३० लाख रुपये किमतीचा माल चोरी गेला आहे. कंत्राटदार रविकांत पाटील यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी चोरीचे प्रकरण नोंदवले आहे. या प्रकरणात संघटित टोळीचा समावेश असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
* मजुराचा मृत्यू, नऊ महिन्यानंतर नोंद
नागपूर : सायकलस्वार मजुराच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी गिट्टीखदान पोलिसांनी अपघाताचे प्रकरण नोंदविले आहे. २ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी हरिचंद तागडे (५०, रा. आंबेडकरनगर) सायकलने जात होते. गिट्टीखदान येथील दाभामध्ये अज्ञात कारचालकाने त्यांना धडक देऊन जखमी केले. ७ मार्च २०२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे प्रकरण नोंदवीत तपास प्रारंभ केला आहे. नऊ महिन्यानंतर पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
.....