लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना‘च्या नियंत्रणासाठी नागपुरदेखील ‘लॉकडाऊन’ झाले आहे. मनुष्यांसमवेत जनावरांनादेखील याचा फटका बसतो आहे. विशेषत: शहरातील हजारो भटक्या कुत्र्यांच्या पोटाची सोय होणे कठीण झाले आहे. त्यामुळे हे कुत्रे आक्रमक होत असून रात्री घोळक्याने फिरत असताना अचानक एखादी गाडी समोर आली तर धावून जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.शहरात हजारो भटके कुत्रे असून त्यांच्या पोटापाण्याची सोय साधारणत: हॉटेल्स, हातठेले, रेस्टॉरेन्ट्समधील फेकलेले अन्न, बाजारांमधील उरलेला माल, नागरिकांनी टाकलेले शिळे अन्न इत्यादींमधून होते. शिवाय काही स्वयंसेवी संस्था व व्यक्ती स्वत:हून पुढाकार घेत दररोज सकाळी व सायंकाळी कुत्र्यांना दूध, बिस्कीट किंवा इतर अन्नपदार्थांचे वाटपदेखील करताना दिसून येतात. ‘लॉकडाऊन’मुळे शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरेन्ट्स बंद आहेत. शिवाय बाजारांमधील विक्रीदेखील मर्यादित झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घरात फारसे अन्न शिळे राहू नये यावर गृहिणींचा भर आहे. तर बऱ्याच स्वयंसेवी संस्था व व्यक्तींना घरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे. अशा स्थितीत कुत्र्यांचे हाल होत आहेत. शिवाय रस्त्यांवर वर्दळ देखील नाही अन् सर्वत्र शांतता अशी स्थिती आहे. त्यामुळे कुत्र्यांना नेमके कळेनासे झाले आहे.रात्रीच्या सुमारास तर अन्नाच्या शोधात कुत्रे घोळक्याने निघत आहेत. अत्यावश्यक यंत्रणेतील कर्मचारी कामावरुन घरी परत जात असेल तर शहरातील काही ठिकाणी हमखास कुत्र्यांचे घोळके दिसून येतात. अनेकांना अशी सवय आहे व त्यामुळे कुत्रे धावत आले की ते वाहन हळू करतात. त्यामुळे कुत्रे शांत होऊन परततात हा त्यांचा अ़नुभव आहे. परंतु आता कुत्रे आक्रमक झाले असून ते अंगावर येण्याचाच प्रयत्न करत आहेत. अगदी जागेवर थांबले तरी त्यांच्यातील आक्रमकता कायम राहत असल्याचे चित्र आहे. यातून कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकारदेखील घडू शकतात.अन् कुत्र्यांपासून झाली सुटकाअत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारा एक अभियंता रात्री अकरा वाजेच्या सुमारास घरी परतत होता. काचीपुरा चौकाजवळ अचानक कुत्रे दुचाकीवर धावून आले. सवयीप्रमाणे अभियंत्याने गाडीचा वेग कमी केला. परंतु तरीदेखील कुत्रे आक्रमक होते व अंगावर येण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे त्याचा तोल गेला व दुचाकीसह तो खाली पडला. मागून दुसरी गाडी आल्यामुळे कुत्रे तिकडे पळत गेले व नशीबानेच अभियंत्यांची कुत्र्यापासून सुटका झाली.कुत्र्यांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावाभटक्या कुत्र्यांची अवस्था खरोखरच दयनीय झाली आहे. पोटातील भूकेमुळेच ते आक्रमक होत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यासाठी शहरातील नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. घरापासून दूर जाणे शक्य नाही. त्यामुळे जवळच्या वस्तीतीत कुत्र्यांसाठी अन्न व पाण्याची सोय करता येईल. याशिवाय जर कुठल्या कुत्र्याला आवश्यकता असेल तर आम्हाला संपर्क केला जाऊ शकतो असे ‘सेव्ह स्पीचलेस आॅर्गनायझेशन’च्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी सांगितले.