लुप लाईनवरील घटना : दहा दिवसातील दुसरी घटना नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आज सकाळी एक मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली. या घटनेत मालगाडीच्या एका वॅगनची पुढील दोन चाके रुळावरून घसरली. परंतु लुपलाईनवर ही घटना घडल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. दुपारी १२.५५ वाजता वॅगनची घसरलेली चाके रुळावर आणण्यात आली. शुक्रवारी सकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची एक मालगाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ८ जवळ यार्डातून जात होती. अचानक या गाडीच्या १७ व्या क्रमांकाच्या वॅगनची पुढील दोन चाके रुळावरून घसरली. याची सूचना त्वरीत नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाने येथे त्वरित ‘अॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन’ घटनास्थळी पाठविली. ही गाडी दुपारी १२.३५ वाजता घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दुपारी १२.५५ पर्यंत मालगाडीची रुळावरून घसरलेली दोन्ही चाके रुळावर आणण्यात यश आले. मागील दहा दिवसात मालगाडीची चाके रुळावरून घसरण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारीला अजनी रेल्वे स्थानकाजवळ यार्डात एका मालगाडीची चाके रुळावरून घसरली होती. या दोन्ही घटनांमुळे रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)
मालगाडी रुळावरून घसरली
By admin | Published: March 11, 2017 2:41 AM