कामठी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १३ उपकेंद्रांवर काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने यांनी दिली.
तालुक्यात काेराेना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये लसीकरणाला वेग देत, आराेग्य उपकेंद्रांमध्ये ही साेय करण्यात आल्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालय, गुमथळा, गुमथी व भूगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोराडी, दिघोरी, तरोडी (बु.), सोनेगाव (राजा), खैरी, खसाळा, येरखेडा, वडोदा, महादुला या ठिकाणी काेराेना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाेबतच ४५ वर्षांवरील वयाेगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. वडाेदा येथे पंचायत समिती सभापती उमेश रडके यांच्याहस्ते लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, सरपंच वनीता इंगोले, विस्तार अधिकारी मनीष दिघोडे, उपसरपंच विशाल चामठ, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ठवकर, वैभव खराबे, मनीषा गभणे, विजय दुरबुडे, हर्षल ठवकर, एस. सोनारे उपस्थित होते.
नागरिकांनी स्वत:चे लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, नायब तहसीलदार राजेंद्र माळी, रणजित दुसावार, आर. टी. उके यांनी केले आहे.