दिनकर ठवळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीत सुरू केलेले काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र १२ दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत असल्याने त्यांची माेठी गैरसाेय हाेत आहे.
या केंद्रावर क्रीडा विभागातील एक माेठे अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसह २९ जून राेजी लस घेण्यासाठी आले हाेते. आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने त्यांना नियमाप्रमाणे रांगेत राहण्याची सूचना केल्याने ते दुखावले गेले. त्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले. या केंद्रावर सर्व सुविधा असल्याने अनेकांनी याला प्रथम पसंती दिली हाेती. दुसरीकडे, काेराडी येथील लसीकरण केंद्राला तुलनेत प्रतिसाद मिळत नव्हता. विशेष म्हणजे, काेराडी व महादुला या माेठ्या लाेकवस्तीच्या गावांना मिळून ते एकमेव केंद्र हाेते. केंद्र बंद करताना लसींचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करण्यात आले.
हे केंद्र दाेन महिन्यांपासून सुरू हाेते. या काळात विजेचे बिल १ लाख २० हजार रुपये आले असल्याचे सांगण्यात आले. या बिलाची रक्कम भरायची कुणी, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, लसीकरणासाठी क्रीडा संकुलाची इमारत देण्यास आपण असमर्थ आहाेत. त्यामुळे लसीकरणाला दिलेली परवानगी रद्द करीत आहाेत, असेही क्रीडा विभागाने काेराडी ग्रामपंचायतला पत्राद्वारे कळविले आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत काेणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही.
७ जुलैला कोराडीसाठी लसीकरणाचे २०० डोस देण्यात आले. ग्रामपंचायतने हे डोस याच खापरी येथील नागरिकांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. तेव्हा ग्रामपंचायतीकडून पर्यायी लसीकरण केंद्राची व्यवस्था केली जाईल, असे सांगण्यात आले हाेते. यासाठी ग्रामपंचायतीने नांदा येथील शासकीय वसतिगृह व कोराडी येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह लसीकरणासाठी निश्चित केले आहे.
...
महादुला येथे लसीकरणाची साेय करा
कोराडी येथील लसीकरण केंद्र बंद केल्याने महादुला येथील नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. महादुला येथील लसीकरणाची वाढती मागणी लक्षात घेता महादुल्याला वेगळे लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. लसीकरण केंद्रासाठी लागणारी सर्व व्यवस्था नगरपंचायतीच्या वतीने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात ग्रामीण भागातील लसीकरणाची व्यवस्था बघणाऱ्या खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी लस उपलब्ध नसल्याने कोराडी येथील लसीकरण केंद्र बंद आहे, असे सांगितले. लस उपलब्ध होताच केंद्र सुरू होईल. लसीकरणासाठी योग्य ती जागा ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
...
संततधार पावसातही लागल्या रांगा
नजीकच्या बोखारा येथील लसीकरण केंद्र सुरू असून, येथे गुरुवारी (दि. ८) १५० डोस उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत असलेल्या या केंद्रावर नागरिकांनी सकाळी ८ वाजतापासूनच रांगा लावल्या हाेत्या. त्यातच संततधार पावसाला सुरुवात झाली. पावसातही अनेक महिला, पुरुष, तरुण भिजत व छत्री डाेक्यावर घेऊन रांगेत उभे होते. पावसातील या रांगा चर्चेचा विषय बनल्या हाेत्या.