आमदार निवासाची रंगरंगोटी : नागभवन, रविभवनातील कामाला सुरुवातनागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. विधानभवनासह आमदार निवास, रविभवन, नागभवन, १६०-२ खोल्यांचे गाळे आदींमध्ये रंगरंगोटी व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार निवासातील खोल्यांमधील जुने कारपेट काढून नवीन टाईल्स लावण्यात येत आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांची व्यवस्था ही सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासात केली जाते. मंत्री आणि काही मोजके नेते सोडले तर बहुतांश आमदार हे आमदार निवासामध्येच मुक्कामास असतात. त्यामुळे आमदार निवासातील दुरुस्तीच्या कामाला आधी सुरुवात करण्यात आली आहे. आमदार निवासातील इमारत क्रमांक १ मधील खोल्यांमध्ये जुने कारपेट होते. ते बदलून नवीन टाईल्स लावल्या जात आहे. तसेच प्रत्येक खोल्यांमधील फर्निचर दुरुस्तीचेही काम सुरू आहे. याशिवाय जुनी झालेली वायरिंग बदलविण्यात येत आहे. १६०-२ खोल्यांचे गाळे पोहोचले २५६ वर १६०-२ खोल्यांच्या गाळ्यांमळे अधिवेशनासाठी येणाऱ्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. २ खोल्या असलेल्या १६० गाळे सुरुवातीला उभारण्यात आले होते. त्यामुळे त्याचे नाव तेच पडले. पुढे २ ऐवजी ३ खोल्या करण्यात आल्या. तसेच चार माळ्याच्या चार नवीन इमारतीसुद्धा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता येथे तब्बल २५६ गाळे झाले आहेत. वर्षभर येथे इतर कर्मचारी राहतात. अधिवेशनाच्या महिनाभरासाठी त्यांना येथील गाळे खाली करावे लागतात. तसा करारच केला जातो. येथील कर्मचाऱ्यांनी गाळे रिकामे केले असून रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. यासोबतच नागभवन आणि रविभवनातील मंत्र्यांचे क्वॉर्टरमध्येसुद्धा दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. रामगिरीत उभारला शामियानाचा डोम‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील रंगरंगोटीच्या कामाला अजून सुरुवात झाली नसली तरी दुरुस्तीच्या कामाला मात्र सुरुवात झाली आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या मंडळींसाठी आणि लहानसहान कार्यक्रमांसाठी रामगिरीतील हिरवळीवर शामियाना उभारण्यात आला आहे.
कारपेट निघाले, टाईल्स लागताहेत
By admin | Published: November 16, 2015 2:55 AM