नागपूर : ४५ वयोगटांवरील अनेक व्यापाऱ्यांनी पहिला तर अनेकांनी दुसराही डोस घेतला आहे, पण बहुतांश व्यापाऱ्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांना अजूनही डोस मिळाला नाही. बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांचा ग्राहकांसोबत संपर्क जास्त येतो. त्यामुळे ४५पेक्षा कमी वय असलेल्या व्यापाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम राबवून प्राधान्याने डोस द्यावे, अशी मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनाद्वारे केली आहे.
चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, देशात दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना नागरिक करीत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. सरकारने संसर्ग थांबविण्यासाठी आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम १ मेपासून सुरू केली होती, पण राज्य शासनाने ही मोहीम काही दिवसांसाठी थांबविली आहे. त्यामुुळे कमी वयोगटातील व्यापाऱ्यांना लसीकरणाचा फायदा मिळत नाही. मोहीम पुन्हा सुरू केल्यानंतर व्यापाऱ्यांना तातडीने लस द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
नागपुरात लस उपलब्ध नसल्याने बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहेत आणि सुरू असलेल्या केंद्रावर लोकांना दुसऱ्या डोससाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये वरिष्ठ नागरिकांचे जास्त प्रमाण आहे. अनेकांना उन्हात वाट पाहावी लागत आहे, तर अनेकांना लसीकरणविना परत जावे लागत आहे.
चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, नागपुरात वाढत्या संसर्गामुळे पर्याप्त कोविड व्हॅक्सिनची व्यवस्था सरकारने करावी. प्रशासनाने ४५पेक्षा कमी वय असलेल्या व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी वेगवेगळी रांग असावी आणि शहरात काही लसीकरण केंद्र दुसरा डोससाठी नागरिकांसाठी आरक्षित ठेवावेत. त्यामुळे नियमांतर्गत सर्व नागरिकांना डोस घेण्यास त्रास होणार नाही.