व्यंगचित्रात ‘मन की बात’ आणि ‘डिजिटल इंडिया’: जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत ‘लक्ष्मणरेषा’ उपक्रमनागपूर : व्यंगचित्र म्हणजे एखाद्या लहानशा चित्रात सामावलेला मोठा आशय आणि एखादा विचारप्रवृत्त करणारा संदेश. त्यामुळेच प्रत्येक व्यंगचित्र बोलके असते. त्यातून एखाद्या घटनेवर भाष्य केले असते. असेच विचारप्रवृत्त करणारे व्यंगचित्रांचे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशीही रसिकांच्या प्रतिसादाने हे प्रदर्शन रंगले. विदर्भातील व्यंगचित्रकारांनी राजकारण आणि विविध समस्यांचा उहापोह करताना त्यांची मते व्यंगचित्रातून सटिकपणे व्यक्त केली आहेत. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त लोकमतच्या पुढाकाराने जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे पाच दिवसीय व्यंगचित्र प्रदर्शन ‘लक्ष्मणरेषा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी गुरुवारी सकाळपासूनच दर्डा आर्ट गॅलरीत गर्दी केली. विदर्भातील नवोदित व्यंगचित्रकारांना संधी देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात मोठ्या संख्येने व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतल्याने विषयांची वैविध्यपूर्ण मांडणी येथे करण्यात आली आहे. यात रंगीत आणि श्वेतधवल व्यंगचित्रांचा समावेश आहे. सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर बहुतेक व्यंगचित्रकारांनी मार्मिक भाष्य केले आहे. राज्याला भेडसावणाऱ्या समस्या ज्यात दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, साठेबाजी, पॅकेज वितरणातील घोटाळे, आर्थिक घोटाळे आदींवर व्यंगचित्रकारांनी नेमकेपणाने प्रहार करताना रसिकांना विचारप्रवृत्त केले. सध्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे आणि पाण्याअभावी लोकांवर स्थलांतरित होण्याची गंभीर वेळ आली आहे. दुष्काळाच्या झळा सांगणारे आणि दुष्काळ पडण्याची कारणे शोधणारी व्यंगचित्रे प्रदर्शनात प्रामुख्याने लक्ष वेधून घेणारी आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, जमिनीतल्या पाण्याचा शोध घेण्यासाठी लोक काय आटापिटा करीत आहेत. थोडे पाणी मिळाले तरी ते पिण्यायोग्य नाही, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत आहेत. या दुष्काळी परिस्थितीशी सामना करताना सारे तंत्रज्ञान आणि विज्ञान अपयशी ठरते आहे. अर्थात निसर्गाचे संतुलन साधले नाही तर भविष्यात माणूसच जगणार नाही, हा संदेश अनेक व्यंगचित्रकारांनी प्रभावीपणे व्यक्त करून जनमानसावर पर्यावरणाचा संस्कार करण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे. एका व्यंगचित्रकाराने तर दुष्काळाला मानवी भक्षण करणारा राक्षसाच्या स्वरूपात सादर केले आहे. प्रत्येक व्यंगचित्रकारांची पंचलाईन आणि वेगवेगळी शैली यामुळे प्रदर्शनात असलेली कमालीची वैविध्यता रसिकांना आनंदित करणारी आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविताना हे प्रदर्शन एक विचार आणि संदेश देणारे आहे, याचे समाधान प्रत्येकानेच यावेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)राजकीय नेत्यांवरील भाष्याला रसिकांची दादसामान्य माणसांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी असमाधान असते. कारण सत्तेत नसताना राजकीय पुढारी मोठमोठी आश्वासने देतात आणि निवडून आल्यानंतर जनतेकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सत्तेचा उन्मादही काहींच्या अंगात येतो. त्यामुळे काही राजकीय नेत्यांविषयी जनतेच्या मनात नाराजी असते. राज्यात दुष्काळ पडला असताना काही नेत्यांनी दुष्काळाच्या घेतलेल्या सेल्फी, राज्यात दुष्काळी स्थितीत माणसांचे जगणे कठीण झाले असताना पंतप्रधान डिजीटल इंडियावर भर देत आहेत. अनेक बँकांचे पैसे बुडवून विजय माल्या देशातून पळून जातो आणि पंतप्रधान मात्र मन की बात मध्ये रमले आहेत, अशा अनेक घटनांवरचे भाष्य रसिकांना खेचून घेणारे आहे. मराठवाड्यात तहान भागविण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करीत असताना आयपील सामन्यात पाण्याचा होणार अपव्यय आणि पाणी वाचविण्यासाठी केले जाणारे दिखाऊ हास्यास्पद उपाय अशा जनतेच्या मनातल्या अनेक विषयांना व्यंगचित्रकारांनी या प्रदर्शनात प्रभावीपणे व्यक्त केले आहे. या प्रदर्शनात व्यंगचित्र प्रदर्शित करण्यासाठी देशातील प्रमुख व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आमंत्रित करण्यात आली. अनेक व्यंगचित्रकार प्रदर्शनात उपस्थित राहून व्यंगचित्रांचा आनंद घेत आहेत आणि आपले सादरीकरण करून नवोदितांना मार्गदर्शनही करीत आहेत. आज सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर तळमळे आणि व्यंगचित्रकार दीपक भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासह ललित कला विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशिष्च शैलीच्या चित्रांची माहिती घेतली. या प्रदर्शनात सहभागी व्यंगचित्रकारांपैकी विजेत्या व्यंगचित्रकारांना पुरस्कृत येणार आहे. हे प्रदर्शन ८ मे पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी खुले आहे.
वैविध्यपूर्ण विषयांनी रंगलेले व्यंगचित्र प्रदर्शन
By admin | Published: May 06, 2016 3:04 AM