मोहन राठोड : माहिती कार्यालयात व्यंगचित्र प्रदर्शन नागपूर : व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वृत्तपत्र व नियतकालिकांमध्ये समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, शृंगारिक, क्रीडाक्षेत्र, सिनेक्षेत्र तसेच प्रबोधनात्मक विषयावरील संदेश मोठ्या खुबीने देतात. यामुळे अनेक लेखांचे काम एक व्यंगचित्र पूर्ण करते, असे प्रतिपादन माहिती संचालक मोहन राठोड यांनी गुरुवारी केले.‘कार्टुनिस्ट झोन वेलफेअर आॅर्गनायझेशन’ व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती संचालक मोहन राठोड यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यंगचित्रकार विनय चाणेकर, जी. एन. बोबडे, विष्णू आकुलवार, राजीव गायकवाड, वैशाली पखाले , जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे तसेच व्यंगचित्र प्रेमी उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रदर्शनात १५० व्यंगचित्रांचा समावेश असून त्यात विविध विषयांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये विदर्भातील व्यंगचित्रकारांबरोबरच मुंबई, पुणे व धुळे येथील नामवंत व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्राचा समावेश आहे. प्रदर्शन शुक्रवारपर्यंत खुले राहील.(प्रतिनिधी)
व्यंगचित्र समाजमनाचा आरसा
By admin | Published: May 06, 2016 3:06 AM