खुनासाठी अपहरणाचे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:57 PM2018-03-16T23:57:19+5:302018-03-16T23:57:30+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनासाठी अपहरणाचे प्रकरण सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनासाठी अपहरणाचे प्रकरण सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आहे. या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परंतु, त्यांनी तपासामध्ये काहीच ठोस प्रगती केली नाही. हे प्रकरण सक्षम तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यासाठी अपहरण झालेल्या मुलाचे वडील शेख हुसैन शेख नजीब यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव शेख अश्फाक आहे. हुसैन यांनी जावई अश्रफ राणा इफजुल रहमानवर अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. अश्रफ राणाने अश्फाकचे अपहरण करून त्याचा खून केला व मृतदेह नष्ट केला असा हुसैन यांचा आरोप आहे. अश्फाकला दारूचे व्यसन होते. अश्रफ राणाने दारूचे व्यसन सोडविण्यासाठी अश्फाकला लखनौ येथे येण्यास तयार केले. ते दोघेही ५ आॅक्टोबर २०१६ रोजी रेल्वेने लखनौकडे रवाना झाले. त्यानंतर १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अश्रफ राणा एकटाच घरी परतला. चौकशी केली असता अश्रफ राणाने तो ९ आॅक्टोबर २०१६ रोजी इटारसी रेल्वे स्थानकावर अश्फाकपासून वेगळा झाल्याची माहिती दिली. परिणामी, हुसैन यांनी १६ जानेवारी २०१७ रोजी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून अश्रफ राणाला अटक केली. परंतु, त्यानंतर तपासामध्ये काहीच ठोस प्रगती झाली नाही. त्यामुळे हुसैन यांनी तहसील पोलिसांवर असक्षमतेचा आरोप करून प्रकरण दुसऱ्या तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. राजेश नायक व अॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.