लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचा दिखावा करीत नाजूक क्षणाचे फोटो काढून ठेवत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन एका आरोपीने विवाहितेला वारंवार खंडणी मागणे सुरू केले. तब्बल साडेपाच लाख रुपये उकळल्यानंतरही त्याचा त्रास सुरूच राहिल्याने प्रकरण पोलिसांकडे पोहचले. त्यामुळे आरोपी शांतनु गजभिये (वय २७, रा. गोविंदनगर) याच्याविरुद्ध अजनी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.तक्रार करणारी महिला (वय ३२) अजनीत राहते. तिचा पती खासगी नोकरी करतो. ५ फेब्रुवारी २०१८ ला आरोपी शांतनुसोबत तिची फेसबुकवरून मैत्री झाली. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाल्यानंतर ते तासन्तास चॅटिंग करू लागले, नंतर त्यांच्यात कथित प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी शांतनु महिलेच्या घरी येऊ लागला. त्याने एकांतातील नाजूक क्षणांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवले, नंतर तो तिला पैशाची मागणी करू लागला. २० हजार रुपये रोख, माहेरचे दागिने, आरडी असे सुमारे ५ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतरही त्याची पैशाची मागणी सुरूच राहिली. त्यामुळे महिला दडपणात आली. तिचे वर्तन पाहून पतीला संशय आला. त्याने तिच्यावर पाळत ठेवली आणि एप्रिलमध्ये या दोघांना पतीने रंगेहात पकडले. पतीने यावेळी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर पैशाचा विषय पुढे आला. पतीच्या सांगण्यावरून महिलेने आरोपी शांतनुला रक्कम परत मागितली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. जास्त त्रास दिला तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देतानाच तुझ्या पतीला मारेन, अशीही धमकी दिली. त्यामुळे महिलेने अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी गुन्हेगारी वृत्तीचा!पोलिसांनी शनिवारी विनयभंग तसेच खंडणी उकळून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीच्या सोमलवाड्यातील घरी पोलीस जाऊन आले, मात्र तो मिळाला नाही. तो गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वीही त्याच्यावर तीन वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या ठाण्यात दाखल असल्याची माहिती उजेडात आल्याचे अजनीचे ठाणेदार शैलेष संख्ये यांनी सांगितली.