लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होप हॉस्पिटलचे संचालक डॉ. मुरली आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध पाचपावली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.डॉ. मुरली यांचे पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत हॉस्पिटल आहे. राघवेंद्र सिंग जादोन हे व्यवस्थापक असलेल्या खासगी वित्तीय कंपनीतून डॉ. मुरली यांनी कर्ज घेतले होते. मागील काही महिन्यांपासून ते कर्जाची किस्त फेडत नव्हते. त्यामुळे राघवेंद्र आणि त्यांचे साथीदार कर्ज फेडण्यासाठी वारंवार त्यांच्याकडे विचारणा करीत होते. राघवेंद्र यांनी त्यांचे कर्मचारी सतीश पाली यांना डॉ. मुरली यांच्याकडे कर्जाच्या किस्तीसाठी पाठविले होते. परंतु त्यांनी सतीश यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. ही बाब सतीश यांनी राघवेंद्रला सांगितली. त्यामुळे राघवेंद्रही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉ. मुरली यांनी राघवेंद्रला आपल्या केबिनमध्ये बोलावले. राघवेंद्रने पुन्हा कर्जाची किस्त फेडण्याची विनंती केली. यावर डॉ. मुरली यांना राग आला. त्यांनी आपल्या साथीदारांसह राघवेंद्र व पालीला मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. राघवेंद्रने या घटनेची तक्रार पाचपावली पोलिसात केली. पोलिसांनी डॉ. मुरली आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला. डॉ. मुरली यांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आले. तेथून त्यांना जामीन मिळाला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. मुरली हे यापूर्वीही चर्चेत राहिले आहे. राघवेंद्रचे म्हणणे आहे की, त्यांना डॉ. मुरली व त्यांच्या बाऊन्सरने मारहाण केली.