लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना गणेशपेठ पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. या अटकेमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिश्रा यांनी गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाला त्रासून सोडले आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अनेक प्रकरणे सुरू आहेत. ताजे प्रकरण हे त्यांच्या बैद्यनाथ चौकातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे आहे.या महाविद्यालयाच्या माध्यमातून मिश्रा हे विविध अभ्यासक्रम चालवितात. यात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पोलीस सूत्रानुसार प्रवेश घेतल्यापासूनच विद्यार्थ्यांचा त्रास सुरु झाला. महाविद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही नव्हते. परीक्षा शुल्क जमा केल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. चिंताग्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केली. विद्यापीठाने मिश्रा यांना २०१७-१८ च्या शैक्षणिक सत्राला काही अटी अंतर्गत मंजुरी दिली होती. त्यांनी या अटींचे पालन केले नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना आपले मूळ दस्तावेज कॉलेजमध्ये जमा केले हे. त्यांनी मिश्रा यांना दस्तावेज परत मागितले. यासाठी अनेकदा कॉलेजच्या चकरा मारल्या परंतु ते परत मिळाले नाही. अखेर त्रस्त होऊन विद्यार्थ्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.अश्विनी रंगारीसह आठ विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली. अश्विनीने फॅशन डिझायनिंगच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. हे तिसरे वर्ष होते. पोलीस दोन दिवसांपासून मिश्राच्या शोधात होते. बुधवरी मीरे ले-आऊट येथील घरून अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पीएसआय डी.आर. कांडेकर करीत आहे.पोलिसांची झाली होती फजितीसुनील मिश्रा यांच्यामुळे शहर पोलिसांची फजिती झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून म्हटले होते की, ‘पोलीस त्यांचेही ऐकत नाही.’ डॉ. काणे यांच्या या तक्रारीमुळे पोलीस विभाग हादरला होता. त्यांची फजिती झली होती. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली.