लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - केमिकल्स स्प्रेच्या इमारतीत लागलेल्या आगीमुळे महिलेचा जळून मृत्यू झाल्याप्रकरणी सदर पोलिसांनी तिघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे गिट्टीखदानमध्ये छर्ऱ्याची बंदूक हाताळताना एकाचा जीव गेल्या प्रकरणीसुद्धा एकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर छावणीतील टेलर लाईनमधील अनिल काटरपवार यांच्या इमारतीत युनिक सेल्स ॲन्ड सर्व्हिस नामक दुकान होते. ७ जानेवारीला सकाळी ११ च्या सुमारास येथे भीषण आग लागून लता गोपाळराव काटरपवार (वय ४५) यांचा मृत्यू झाला. आरोपी दुकानदार अल्फाज शरिफ अन्सारी (वय ३०), अशपाक शरिफ अन्सारी (वय ३१) आणि इमारत मालक अनिल शंकर काटरपवार (वय ३७) यांनी दुसऱ्या माळ्यावर विनापरवाना फटाके साठवून ठेवले. तसेच संबंधित विभागाची परवानगी न घेता आरोपींनी तेथे ज्वलनशिल रासायनिक पदार्थ साठवून ठेवले. या तिघांच्या निष्काळजीपणामुळे आग लागून लता काटरपवार यांचा जीव गेल्याचे तपासात उघड झाल्यामुळे सदर पोलिसांनी या प्रकरणी अन्सारी बंधू आणि इमारत मालक काटरपवार या तिघांविरुद्ध कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अन्सारी बंधूंना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
गिट्टीखदान प्रकरण
आरोपी पंकज विलासराव वाणी (वय ४०) हा दाभ्याच्या कन्यकापूरम सोसायटीत राहतो. त्याने एअरगन (छर्ऱ्याची बंदूक) विकत घेतली. ती कशी चालवली जाते, हे दाखवण्यासाठी आरोपी पंकज त्याचा मित्र लोकेश जंगलूजी गजभिये (वय ४२) यांच्याकडे आला होता. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास हे दोघे तसेच हितेश मेघशाम बडगे असे तिघे मित्र आरोपी पंकजची एअरगन हाताळत असताना अचानक बंदुकीतील छर्रा लोकेशच्या डाव्या डोळ्यात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूला आरोपी पंकज वाणीचा हलगर्जीपणा असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने गिट्टीखदान पोलिसांनी गीता वसंत पाटील (वय ५२, रा. भिवसनखोरी)यांची तक्रार नोंदवून घेत पंकजविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.