आॅनलाईन लोकमतनागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या वर पक्षातील चौघांविरुद्ध वधू पक्षाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.तुकडोजी पुतळ्याजवळच्या न्यू सोमवारी क्वॉर्टर परिसरात कुंदा विठ्ठलराव गायकवाड (वय ४८) राहतात. त्यांच्या मुलीचे लग्न दिल्लीत राहणाऱ्या रोहित अनिल खंडागळे याच्यासोबत जुळले. दोन्हीकडून आधीच ठरवण्यात आल्याप्रमाणे देणे-घेणे झाले. दोन्ही पक्षातील मंडळी ३ सप्टेंबरपासून एकमेकांच्या संपर्कात होती. परस्पर संमतीने रविवारी १० डिसेंबर २०१७ ला हे लग्न पार पाडण्याचे ठरले. १८ नोव्हेंबरला अचानक वर पक्षातील मंडळींनी लग्न समारंभाच्या खर्चासाठी वधू पक्षाकडे पैशाची मागणी केली. आधीच खर्च झाल्यामुळे आता अतिरिक्त पैसे देणे शक्य नाही, असे म्हणून वधूच्या आई कुंदा गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही पक्षातील कुरबुरी वाढत गेल्या. मात्र, होईल सगळ व्यवस्थित असे समजून वधू पक्षाकडून लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली. त्यासाठी वधूच्या आईने ६ लाख, ४० हजारांचा खर्च केला. दरम्यान, पैसे दिले नाही म्हणून वराकडील मंडळींनी लग्न लावण्यास नकार दिला. रविवारी लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी वर पक्षाची नकारघंटा कायमच होती. त्यामुळे हे लग्न झालेच नाही. आपल्याला एवढा खर्च करायला लावून ऐनवेळी लग्नास दिल्यामुळे वधूची आई कुंदा गायकवाड यांनी वर रोहित अनिल खंडागळे, त्याचे वडील अनिल खंडागळे, रेखा खंडागळे आणि आशा कदम या चौघांविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक वडोदे यांनी त्यावरून उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.लॉन सजले, मात्र समारंभच नाहीरविवारी हे लग्न होणार होते. त्यामुळे हुडकेश्वरमधील पिपळा फाट्यावर असलेले मिरा लॉन सजले. बरेचसे पाहुणेही आले. परंतु वरातच आली नाही. त्यामुळे लग्न समारंभ पार पडला नाही.
नागपुरात हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:21 PM
हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या वर पक्षातील चौघांविरुद्ध वधू पक्षाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देवर पक्षाने ऐनवेळी लग्नास दिला नकार