लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी बिल विरोधात युवक काँग्रेसतर्फे मंगळवारी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या स्मृतिमंदिरसमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले होते. कुठलीही परवानगी न घेता अचानकपणे केलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा एजन्सीची धावपळ उडाली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत आंदोलनाचे नेतृत्व करणारे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १९ आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता रेशीमबाग येथील संघाच्या मुख्यालयासमोर थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे संघ मुख्यालयात तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. लगेच अतिरिक्त पोलीस बोलाविण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह अमर पराते, नावेद अहमद शेख, नमन परवकर, अक्षय घाटोळे, निखील कापसे, अखिलेश राजवंश, सागर चव्हाण, स्वप्निल ढोके, मोहीज खान, शोहेब खान, मोकशीर सजीद अहमद, तौशीफ खान, वसीम शेख, अखिलेश राजन, मोईन खान, शुभम तल्हार, अभिषेक पाटील आणि शोएब खान यांच्याविरोधात दंगा व राष्ट्रीय आपत्ती अधिनियम तथा संसर्गजन्य रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. येथे परवानगी न घेता आंदोलन करणे गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
गणेशपेठच्या ठाणेदाराची तडकाफडकी बदली
गणेशपेठचे ठाणेदार शिवराम कुमरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सूत्रानुसार एका आंदोलनादरम्यान संथ भूमिका घेतल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस आयुक्तांनी मंगळवारी रात्री तत्काळ प्रभावाने कुमरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली. या बदलीमुळे ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.