नागपूर : एका कॅन्सरग्रस्ताची मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी सदर पोलिसांनी मध्य प्रदेशातील मन्नत बाबासह सात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रामुख्याने भोपाळचे प्रसिद्ध मन्नत बाबा उर्फ संजयकुमार सिंग (मृणाल रेसिडेन्सी- चार), देवीदास गावंडे (गड्डीगोदाम), गीता देवीदास गावंडे, धीरज गावंडे, कुणाल गावंडे, दिनेश आचारी (शिवाजीनगर), प्रमोद डवले (सुरेंद्रनगर) यांचा समावेश आहे.
फिर्यादी प्रियांका शंभरकर या मोहननगर येथील रहिवासी आहेत. प्रियांकाच्या वडिलांची मावशी कुसुम शंभरकर यांना मूलबाळ नव्हते. मध्य प्रदेश मंत्रालय (भोपाळ) येथे कार्यरत असलेल्या कुसुम शंभरकर यांनी प्रियंकाला बालपणी दत्तक घेतले होते. ते मूळचे नागपूरचे रहिवासी असल्याने त्यांची सर्व मालमत्ता नागपुरात आहे. प्रियंकाच्या संगोपनाची जबाबदारी कुसुम शंभरकर घेत होत्या. दरम्यान, आरोपी मन्नत बाबाशी कुसुम शंभरकरची भोपाळमध्ये ओळख झाली.
पूजेच्या निमित्ताने ती बाबाला भेटत असे. २००९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कुसुम शंभरकर या नागपुरात एका घरात राहत होत्या. कॅन्सरमुळे त्यांना ९ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना मानकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना ३० ऑक्टोबर २०२१ रोजी डिस्चार्ज देण्यात आला व ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.
कुसुम शंभरकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजेच्या वेळी मन्नत बाबाने त्यांच्या घरी पोहोचून प्रियंकाची भेट घेतली. कुसुम यांनी मोहननगर येथील फ्लॅट व नारीचा प्लॉट माझ्या नावावर व बाबादीपसिंग नगर घर येथील मामा देवीदासचा मुलगा धीरज याच्या नावे केला आहे. प्रियंकाला आपल्यासोबत काहीतरी मोठे षडयंत्र रचल्याचा संशय आला. चौकशीत त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून समजले की कुसुम यांना १५ सप्टेंबर रोजी संजयकुमार सिंग उर्फ मन्नत बाबा आणि त्याच्या मामाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध अचानक रुग्णालयातून बाहेर काढले होते. कुसुम कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक होते.
कुटुंबीयांना माहितीच दिली नाही
दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी मन्नत बाबाला त्याच्या नावावर फ्लॅट आणि प्लॉट गिफ्ट डीड मिळाले. त्याच्या मामाच्या कुटुंबियांनी बाबाच्या संगनमताने आरोपी धीरजच्या नावे बाबादीपसिंग नगर येथे एक मजली घराचे मृत्यूपत्र केले होते. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी इतर आरोपींनी मदत केली. यानंतर १६ सप्टेंबर रोजी कॅन्सरग्रस्त कुसुमला आरोपींनी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रियांका आणि शंभरकर कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
यासंदर्भात केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर एनजीओ कृती समिती आणि ॲड. व्ही.व्ही. महंत यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६,४२०,४६८,४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.