लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेत राहणाऱ्या नागपूरकर दाम्पत्याचा दुसऱ्याने गहाण ठेवलेला कोट्यवधींचा भूखंड परस्पर विकल्याचे प्रकरण कन्यका नागरी सहकारी बँकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार तसेच बँकेच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
डॉ. तुकाराम भास्करवार, दीपक गुंडावार, संतोष चिल्लरवार, विलास वेंगीनवार, धनंजय ताटपल्लीवार, नितीन आयिचवार आणि किशोर गोलीवार असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांची नावे असून, यांच्यासह स्वप्निल भोंगाडे (बेसा), शिशिर भोंगाडे (मनीषनगर), संजय उमाठे (नरेंद्रनगर), दिनेश ढोके (महाल), पराग भोसले, अनिता भोसले (महाल), नरेश मौंदेकर (राऊत चौक) आणि यशवंतसिंग सकरवार (शांतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला मनोहर कऱ्हाडे (विक्रोळी, मुंबई) यांनी कन्यका नागरी सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह एकूण १६ जणांविरुद्ध तक्रार केली होती. त्यानुसार, जून २०२० ला कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूरच्या सीताबर्डी शाखेने मनोहर कऱ्हाडे नावाच्या व्यक्तीचा भूखंड लिलावास काढल्याची माहिती मिळाली. शीला कऱ्हाडे यांनी लगेच बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी स्वप्निल भोंगाडे याच्या कन्यका नागरी बँकेतील कर्ज खात्यास तो भूखंड गहाणखत असल्याचे त्यानंतर पुढे आले. बँकेत मनोहर कऱ्हाडे नावाचा तोतया व्यक्ती उभा करून तो भूखंड गहाण ठेवला. त्या भूखंडावर एक कोटी २५ लाखांचे कर्ज उचलण्यात आले. बँकेचे दलाल पराग भोसले आणि अनिता भोसले यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यावर पुन्हा ६० लाखांचे कर्ज काढले. कर्ज न भरल्याने तो भूखंड कन्यका नागरी बँकेने लिलावात काढला. शीला कऱ्हाडे यांच्या तक्रारीची चाैकशी झाल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी बँकेच्या आठ पदाधिकाऱ्यांसह १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या संबंधाने आ. जोरगेवार यांच्याशी लोकमतने संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
प्रकरणाची उलटसुलट चर्चा
प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असल्यामुळे अद्याप कुणाला अटक झालेली नाही, असे बजाजनगर पोलिसांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, हे प्रकरण जुने असून, गेल्या २४ तासांपासून ते राजकीय वर्तुळासह सोशल मीडियात व्हायरल झाल्याने यासंबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे.