नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अजनी पोलिसांनी युवा सेनेच्या प्रदेश सहसचिव विशाल केचेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यात खळबळ उडाली आहे.
विशाल दिनकर केचे रा. अमरावती, मंगेश कुंदनसिंह सेंगर रा. अमरनगर, शोभा वामन काळे, लक्ष्मी यशवंत चापके आणि पुरुषोत्तम काळे रा. बजरंगनगर अजनी अशी आरोपींची नावे आहेत. न्यू बाबुलखेडा येथील रहिवासी प्रशांत जवने यांनी बेसाच्या जय गुरुदेवनगरमध्ये वंदना रवींद्र चाचेरकर यांच्याकडून २५ लाखांत दोन प्लॉट खरेदी केले होते.
प्रशांतच्या तक्रारीनुसार ते १५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्लॉटवर सफाई करीत होते. त्यावेळी मंगेश सेंगर तसेच विशाल केचे नावाचे व्यक्ती तेथे आले. त्यांनी शोभा काळेला तो प्लॉट १६ सप्टेंबर २०२० रोजी खरेदी केल्याची माहिती दिली. प्रशांतने दोन्ही बाजूची पडताळणी केली असता शोभा काळे यांनी ताजकृपा गृहनिर्माण सहकारी सोसायटीकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली.
शोभा काळे यांनी १३ डिसेंबर १९९१ रोजी हा प्लॉट ईश्वर चिनोरे यांना विकला होता. चिनोरे यांच्या एकमेव वारसदार त्यांची मुलगी वंदना चाचेरकर होत्या. वंदनाकडून हा प्लॉट प्रशांतने खरेदी केला होता. आरोपींनी शोभा काळेच्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्याची माहिती मिळताच प्रशांत जवने यांनी अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्या आधारावर शनिवारी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशाल केचे काही दिवसांपासून युवा सेनेत प्रादेशिक सचिव झाला आहे. युवा सेनेत हे एक मोठे पद आहे. तो मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे. तो नुकताच शहरात सक्रिय झाला आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे युवा सेना नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकत्याच घडलेल्या प्रकरणामुळे युवा सेनेतील वातावरण संतप्त झाले आहे.