नागपूर : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाची कामे करणाऱ्या कंत्राटदाराच्या विरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कंत्राटदाराने निविदा प्रस्तावातील मूळ एफडी काढून त्याजागी हुबेहुब रंगीत एफडी जोडली होती. हे बँकेच्या अहवालातून सिद्ध झाले. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या फसवणुकीचा असल्याने कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी सदर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रविवारी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नानक कन्स्ट्रक्शन या नावाने कंत्राटदार रोशन पाटीलने लघुसिंचन विभागाचे काम मिळविले होते. या कामाची अनामत रक्कम व परफॉर्मन्स रक्कम ७३ लाख ९८ हजार ५०० रुपये एफडी मार्फत लघुसिंचन कार्यालयात जमा केली होती. परंतु एफडी बाबत लघुसिंचन विभागाला शंका आल्याने त्यांनी काटोल येथील स्टेट बँकेला यासंदर्भात विचारणा केली. कंत्राटदार रोशन पाटील याने बँकेतील एफडीची ९ डिसेंबर २०१९ व १२ ऑगस्ट २०२० रोजी सर्व रकमेची उचल केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे निविदा प्रस्तावासोबत जोडलेल्या एफडीची रक्कम कामाचा दोष कालावधी संपेपर्यंत किंवा काम पूर्ण होईस्तव काढता येत नाही. तरीही कंत्राटदाराने एफडीची रक्कम काढली. त्यामुळे कंत्राटदारावर ७३ लाख ९८ हजार रुपये रकमेचा अपहाराचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवला होता. सदर पोलिसांनी कंत्राटदार रोशन पाटील यांच्यासह इतर तीन संचालकाविरुद्ध भादंविच्या ४६७, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे़
- काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव
सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लघुसिंचन विभाग, स्थायी व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचा दाखला देत नानक कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची फाईल सीईओ योगेश कुंभेजकर यांच्याकडे मंगळवारी पाठविण्यात आली आहे़