लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुऱ्यातील प्रतिबंधित क्षेत्रातून आपल्या वडिलांना दुसºया भागात नेऊन ठेवणाºया आरोपी मुलाविरुद्ध तसेच ही माहिती लपवून ठेवणाऱ्या वृद्ध व्यक्तीविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मोहम्मद अतिक अन्सारी (वय ३२) आणि मोहम्मद जलील मोहम्मद हुसेन (वय ६२) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे मोमिनपुरा कब्रस्तान मार्गावर राहतात. हा परिसर कोरोना प्रभावित असल्याने प्रशासनाने त्या क्षेत्राला सील केले आहे. तेथून नागरिकांनी बाहेर जाऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आरोपी अतिकने त्याचे वृद्ध वडील जलील यांना मोटरसायकलवर बसवून ९ मे रोजी खरबीतील बाबा फरिद नगरात असलेल्या जुन्या घरी आणून सोडले. तेथे ९ मेपासून जलील राहत आहेत. ही माहिती वाठोडा पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस पथकाने त्या घरी जाऊन मोहम्मद जलील यांना विचारपूस केली असता आपल्या मुलाने आपल्याला येथे मोमिनपुऱ्यातून ९ मे रोजी मोटरसायकलने आणून सोडले, असे जलील यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातून दुसरीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असूनदेखील कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती आरोपी अतिक आणि त्याचे वडील मोहम्मद जलील या बापलेकांनी केल्यामुळे पोलिसांनी आज त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खरबी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातून दुसऱ्या भागात राहायला आलेल्या बापलेकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:03 AM