गैरकायदेशीर गुंठेवारी प्रकरण अंगलट: मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता
काटोल : काटोल नगर परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या एकूण ३८ गुंठेवारी प्रकरणात अनधिकृतरीत्या मंजुरी दिल्या प्रकरणी काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्यासह न.प.चे सहायक नगर रचनाकार दिनेश गायकवाड आणि रचना सहायक विपीन भांदककर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काटोल पोलिसांनी मंगळवारी रात्री या तिघांवर कलम ४२०,४०९, १६६,१६७,३४ अंतर्गत गुन्हे दाखल करीत तपास सुरु केला आहे. काटोल नगर परिषद हद्दीतील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणात जबाबदारी नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र काटोल पोलिसांना उपविभागीय अधिकारी कार्यालय, काटोल यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानुसार सोमवरी रात्री तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. यात मोठे मासे अडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. काटोल नगर परिषदेंतर्गत सर्व्हे नंबर २१४/६ नवीन (१०३८) मध्ये व सर्व्हे क्रमांक ६७१ व ६७२ (नवीन सर्वे नंबर ७२६ व ७२७) मध्ये गुंठेवारी करते वेळी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार राधेश्याम बासेवार यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत काटोल उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यावर तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून येत असून या प्रकरणातील पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, नागपूर यांना नगर विकास विभागाच्यावतीने ४ नोहेंबरला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणी कारवाई करण्याचे पत्र दिले होते.महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण )अधिनियम २००१ अनधिकृतरीत्या मंजूर केलेल्या ३८ प्रकरणांचा यात समावेश आहे.
गराटे कर्तव्यावर कसे?
काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांच्या गुंठेवारी प्रकरणात गुन्हा दाखल असताना ते मुख्याधिकारी पदावर कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.