लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृद्ध सासूचा अपमान करून तिला नेहमी मारहाण करणाऱ्या तसेच सासूला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सुनेच्या विरोधात अखेर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सत्यभामा देवराव कामडी (वय ७५) असे मृत सासूचे नाव आहे. त्या श्रीहरीनगर, मानेवाडा परिसरात राहत होत्या.सत्यभामा यांचा मुलगा सुरेशचा विवाह स्मिता नामक तरुणीसोबत २००४ मध्ये झाला होता. शीघ्रकोपी स्मिता सासूला त्रास देत होती. त्यातून पती-पत्नीत वाद व्हायचा. मुलाच्या संसारात तेढ नको म्हणून सासू सत्यभामा आपल्या वृद्ध पतीसोबत वेगळ्या ठिकाणी राहायला गेल्या तर स्मिता आणि सुरेश वेगळे राहू लागले होते. स्मिताचा सुरेशलाही त्रास वाढल्याने प्रकरण भरोसा सेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी वेगळे होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भरोसा सेलवाल्यांनी त्यांना एकत्र राहण्याचा सल्ला दिल्याने ते पुन्हा एकत्र राहू लागले. दरम्यान, १० जुलैला स्मिताने सासू सत्यभामा यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यांच्या कंबरेत लाथ घालून घरातून निघून जाण्यास सांगितले. या अपमानामुळे अस्वस्थ झालेल्या सत्यभामा मानेवाडा घाटावर गेल्या आणि त्यांनी उंदिर मारण्याचे विषारी औषध खाल्ले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना तेथील काही लोकांनी रुग्णालयात पोहचविले.तिकडे सत्यभामा बेपत्ता झाल्याने घरच्यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, आई मेडिकलमध्ये असल्याचे कळताच सुरेश कामडी तेथे पोहचले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री सत्यभामा यांचा मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. वृद्ध आणि सरळमार्गी सत्यभामा यांच्या मृत्यूला त्यांची सून स्मिताच कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा होती. सत्यभामा यांचा मुलगा सुरेश देवराव कामडी (वय ४६) यांनीही पोलिसांकडे तक्रार नोंदवत आईच्या मृत्यूला पत्नी स्मिताच कारणीभूत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी तब्बल महिनाभर तपास केल्यानंतर बुधवारी या प्रकरणात आरोपी स्मिता सुरेश कामडी (वय ४३) हिच्याविरुद्ध सासू सत्यभामा यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात सासूचा बळी घेणा-या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 9:28 PM
वृद्ध सासूचा अपमान करून तिला नेहमी मारहाण करणाऱ्या तसेच सासूला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सुनेच्या विरोधात अखेर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देवृद्धेच्या मुलाची पत्नीविरुद्ध तक्रार : हुडकेश्वर पोलिसांची कारवाई