लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून नागपूर शहराशी संबंधित खोटी अफवा पसरविल्याबद्दल सदर पोलीस स्टेशन मध्ये सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावरून केलेल्या पोस्टमध्ये मोमीनपुरा, शांतीनगर, पिलीनदी, जाफरनगर, गांधीबाग, ताजबाग, कामठी आणि हसनबाग हे क्षेत्र पोलिसांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याचे म्हटले होते. तसेच हा परिसर पोलीस नियंत्रणाबाहेर असल्याने मिल्ट्री फोर्सला पाचारण केले असून या परिसरात त्यांच्याकडून सक्त निगराणी केली जाणार आहे. तसेच लाठीचार्ज व रबरी बुलेटने फायरिंग केले जाणार आहे. त्यामुळे कोणी घरातून निघू नका, बाहेर फिरू नका, घराबाहेर पडू नका असे आवाहन संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावरून केले होते.या आशयाची पोस्ट सोशल मीडियावरून फिरत असल्याचे लक्षात येताच पोलीस आयुक्त कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने खातरजमा केली असता असे कसलेही आदेश नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षात यासंदर्भात माहिती देण्यात आली. याप्रकरणी नागपूर शहर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक श्रावण बागुल यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध भादवि कलम 188 506 (1) , (ब), 54 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.