लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेवानिवृत्ती वेतन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. विशेषत: शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ देण्याचे निर्देश आहेत. त्याकरिता निवृत्तीच्या आठ महिन्याआधीच कागदपत्र तयार करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना आहेत. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. पाच महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीसाठी चकरा मारण्याची वेळ आली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय, असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्या कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे केला, आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.त्या कर्मचाऱ्याचे नाव कृष्णा धार्मिक असे आहे. प्राप्त माहितीनुसार, जुलै २०१९ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ मिळतील, अशी अपेक्षा होती. सेवानिवृत्तीनंतर पैशासाठी पहावी लागणारी वाट आणि मारावे लागणारे हेलपाटे आपल्या वाट्याला येणार नाही, याची त्यांना खात्री होती. सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. परंतु अधिकाऱ्यांनी पाठ दाखविली. ज्याची भीती होती तेच झाले. मेयो रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता यांच्याकडे खेटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु ‘न्यू इनकॅशमेंट पेमेंट’ तातडीने मिळाले नाही. नियमानुसार, सेवानिवृत्तीच्या सहा ते आठ महिन्यापूर्वीच सेवा पुस्तिकेतील नोंदी पूर्ण करुन वेतन पडताळणी पथकाकडे पाठविणे आवश्यक होते. सेवानिवृत्तीच्या दिवशी संपूर्ण आर्थिक लाभ मिळावे, ही त्या मागची भूमिका आहे. परंतु मेयोतील निवृत्त झालेल्या १५ पेक्षा अधिक कर्मचारी अजूनही खेटे मारत आहेत. सेवानिवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. या घटनेचा धार्मिक यांना जबर धक्का बसला. धार्मिक यांच्या मृत्यूनंतर वेतनाचा प्रश्न कायम आहे. यामुळे तो त्वरित सोडवण्यात यावा यासाठी विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटने (इंटक) च्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना निवेदन दिले.संचालक व सचिवांनी याला गंभीरतेने घ्यावेसेवानिवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांचा आर्थिक लाभ देण्याचा नियम आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी याला गंभीरतेने घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात ती सोय झाली होती. परंतु आता वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने धार्मिकसारख्या कर्मचाऱ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालकांनी याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.त्रिशरण सहारेराष्ट्रीय,उपाध्यक्ष, यूथ इंटक
मेयोतील प्रकरण : सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रतीक्षेत मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 8:32 PM
पाच महिन्यापूर्वी निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीसाठी चकरा मारण्याची वेळ आली. माझ्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय, असा सवाल अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्या कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे केला, आणि दुर्दैवाने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देसेवानिवृत्तीच्या दिवशीच आर्थिक लाभ देण्याकडे दुर्लक्ष