नागपूर : रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे प्रकरण पुढे येताच खळबळ उडाली आहे. याची चौकशी करण्यासाठी उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने आता पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून साधारण एक आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
नागपुरातील किती मुलांना रक्तपेढीतील रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाली याचा नेमका आकडा अद्याप पुढे आलेला नाही. मात्र, थॅलेसेमियाबाधित तीन वर्षांच्या चिमुकलीच्या आईने आठ महिन्यांपूर्वी रक्तपेढीतून उपलब्ध रक्तातून ‘एचआयव्ही’चा संसर्ग झाल्याची व इतरही काही मुले बाधित असल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीसाठी उपसंचालक आरोग्य विभागाने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यात दोन सदस्य ‘एमडी पॅथोलॉजिस्ट’, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नागपूर येथील दोन औषधी निरीक्षक व ‘सेंट्रल एफडीए’ येथील एक औषधी निरीक्षकाचा समावेश आहे. साधारण एक आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.