लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड करणे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी शेळकेंसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, धमकावणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त ईव्हीएम नेणारे वाहन किल्ला परिसरातील बुथबाहेर निघाले. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबवली. त्यांनी शिवीगाळ करत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी (एमएच १९, बीयू ६०२७) ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सनी कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले. तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले.
ही बातमी पसरताच भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर रात्री तुफान राडा झाला. ईव्हीएमसोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत झोन अधिकारी हुमैद नाजीर खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खान यांना नियमानुसार राखीव ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. त्यांच्या वाहनात ते ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजता मतदानाच्या अहवाल फॉर्मची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी ते बुथवरून वाहनातून निघाले. कल्याणेश्वर मंदिर ते झेंडा चौकादरम्यान झेरॉक्स सेंटर पाहून खान थांबले. तेथे हा प्रकार घडला. खान यांनी शेळके यांना नेमके तथ्यदेखील सांगितले. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दरम्यान, वाहनातील निखिल गाडगीळ हा तेथे उभा होता. त्याच्यावर गर्दीतीलच एका व्यक्तीने चाकूने वार केले. त्याला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.
आमिष दाखवल्याचा गुन्हाही दाखल झाला नाईक तलाव येथील काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ पाचशे रुपयांचे लिफाफे सापडल्याप्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयातून पाचशे रुपये असलेले सहा लिफाफे आणि तीन रिकामे लिफाफे जप्त करण्यात आले. ऑफिसमध्ये ६ मुली आणि ८ तरुण बसले होते. भरारी पथकाचे प्रभारी हर्षवर्धन वहाणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.