सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उजेडात - सक्करदरा पोलिसांकडे तक्रार
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सक्करदऱ्यातील तरुणीच्या विक्रीचे खळबळजनक प्रकरण ‘लोकमत’ने बुधवारी उजेडात आणल्यानंतर समाजमाध्यमावर ते चांगलेच चर्चेला आले आहे. दरम्यान, महिला-मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचे नेटवर्क नागपूर-महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातही असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट झाले आहे.
या टोळीच्या आमिषाला बळी पडल्यामुळे पोटच्या मुलीचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे कल्पना यांना लक्षात आले. तशात आरोपी महिलांनी राजकोटवरून परतताना धावत्या रेल्वेतून फेकून देण्याची धमकी आणि ५० हजारात इंदूरला विकण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे हादरलेल्या कल्पना कशाबशा नागपुरात पोहचल्या. त्यांनी पती आणि मुलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पती व मुलासह त्या राजकोटकडे निघाल्या. तेथे घोडाजी गावात सीमाला ज्यांनी विकत घेतले होते त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा धाक दाखवला. त्यामुळे आरोपींनी सीमाला त्यांच्या हवाली केले. त्यानंतर सीमा तिच्या कुटुंबीयांसोबत नागपुरात पोहचली. नऊ महिन्यात दोनदा विकली गेल्याने आणि दोन्हीकडून शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या गेल्यामुळे सीमाला जबर मानसिक धक्का बसला आहे. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्या ॲड. भारती तामगाडगे, हेमा धुर्वे, कल्याणी शिंदे आणि प्रीती कापसे यांच्या कानावर जाताच त्यांनी या कुटुंबाला मानसिक आधार दिला. त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
आंतरराज्यीय रॅकेट हाती लागण्याची शक्यता
सीमाची नऊ महिन्यात दोनदा विक्री करून साडेतीन लाख रुपये हडपणाऱ्या आरोपी महिला बिनधास्त शहरात वावरत आहेत. त्यांनी त्यापूर्वी आणि सीमाच्या विक्रीनंतरही अनेक तरुणी तसेच महिलांची विक्री केल्याचा संशय आहे. अहमदाबाद, राजकोट, इंदूर अशा वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात या टोळीचे नेटवर्क असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले असून पोलिसांनी या टोळीची कसून चाैकशी केल्यास महिला-मुली विकणारे एक आंतरराज्यीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----