नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी दोनदा धमकी देणारा आरोपी जयेश पुजारीचे देशविरोधी संघटनांच्या सदस्यांशी संबंध असल्याची बाब समोर आली आहे. नागपूर पोलीस व केंद्रीय तपासयंत्रणांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून त्याच्याविरोधात ‘युएपीए’अंतर्गत (अनलॉफुल प्रिव्हेंशन ॲक्टिव्हिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश हा ‘पीएफए’ तसेच ‘लश्कर-ए-तोएबा’च्या सदस्यांच्या संपर्कात होता.
जयेशने नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा फोन करून खंडणी मागितली. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याने हे फोन केले होते. या प्रकरणात त्याला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेण्यात आले. नागपूर पोलिसांसह केंद्रीय तपासयंत्रणांनीदेखील त्याची चौकशी केली. यातून त्याचे ‘पीएफए’ व ‘लश्कर-ए-तोएबा’च्या सदस्यांशी संपर्क असल्याची बाब समोर आली.
तो १० वर्षांपासून तुरुंगात बंद होता. बेळगाव व मंगळुरू येथील तुरुंगात तो या संघटनांच्या सदस्यांच्या संपर्कात आला होता. हे सदस्य देशविघातक कारवाया करत होते व जयेशदेखील त्यांच्यात सहभागी झाला. या संघटनांच्या देशाबाहेरदेखील ‘लिंक्स’ आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करण्यामागे देशाच्या बाहेरील एखादी संघटना किंवा व्यक्तीचा हात आहे का याची सखोल चौकशी तपासयंत्रणांकडून सुरू आहे.
जयेशकडे देशातील मोठ्या नेत्यांचे क्रमांक
पोलिसांनी २० दिवसांअगोदर जयेशचा ताबा घेतला. त्याचे सीमकार्डदेखील जप्त करण्यात आले. त्यात नितीन गडकरी यांच्यासोबतच देशातील काही मोठ्या नेत्यांचे क्रमांक आढळले. तेदेखील त्याच्या ‘टार्गेट’वर होते का याची चौकशी तपासयंत्रणांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचे देशाच्या बाहेर लिंक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय तपासयंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.