लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात असलेल्या रुग्णालयातील कॅशियरवर हल्ला करून जखमी केले आणि त्यांच्याजवळचे २.२० लाख रुपये लुटून नेले. ही घटना सोमवारी दिवसाढवळ्या कामठी येथे घडली.विक्रम वैद्य (३२) असे जखमीचे नाव आहे. ते आशा हॉस्पिटलमध्ये कॅशियर आहेत. ते बँकेचे कामकाज सांभाळतात. नेहमीप्रमाणे ते सोमवारी दुपारी अॅक्टिवाने बँकेत जात होते. त्यांना कामठीतील एचडीएफसी आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेत रक्कम जमा करावयाची होती. विक्रम यांनी नोटांची बॅग दुचाकीच्या हँडलवर लटकवली होती. कामठीतील वारिसपुरा येथे चौधरी हॉस्पिटलजवळ अॅक्टिवाने आलेल्या दोन युवकांनी विक्रमला थांबवले. त्यांनी तोंडाला कापड बांधले होते. मुलीची छेड काढण्याचा आरोप करीत त्या दोघांनी विक्रमला लाथा-बुक्क््यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्याने विक्रमला काहीच समजले नाही. नागरिकांनीही मारहाण होत असताना बघ्याची भूमिका घेतली. आपसातील भांडण समजून कुणीही समोर आले नाही. दरम्यान आरोपी नोटांची बॅग घेऊन फरार झाले. विक्रमने आशा हॉस्पीटलचे संचालक डॉ. अग्रवाल यांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली.विक्रम यांचा कामठीतील हॉस्पिटलपासून पाठलाग केला जात होता. दोन युवक विक्रम रवाना होण्याची प्रतीक्षा करीत होते. ते आरोपी युवक हॉस्पीटलच्या सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहेत. या युवकांनीच आपल्या साथीदारांना विक्रम हॉस्पिटलमधून रवाना झाल्याची माहिती दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बॅग लुटून आरोपी नागपूरच्या दिशेने फरार झाले. त्यांची पंढऱ्या रंगाची अॅक्टिवा गाडीही सीसीटीव्हीमध्ये दिसून आली आहे. परंतु गाडीला नंबर प्लेट नव्हती.कामठी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या २४ तासात ही दुसरी मोठी घटना आहे. रविवारी रात्री जुनी कामठीच्या गूळ ओळीमध्ये एका सराफा व्यापाऱ्याची नजर चुकवून दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आली. लाला ओली येथील रहिवासी मयुर गुरव सकाळी ११ वाजता दुकान उघडत होते. या दरम्यान अज्ञात आरोपी त्यांची बॅग घेऊन फरार झाले. बॅगेत ३० हजार रुपये व १७ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने होते. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. सोमवारी सराफा व्यापाऱ्यांनी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांची भेट घेऊन आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची विनंती केली.उशिरा पोहोचले पोलीसपोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची लगेच सूचना देण्यात आली. परंतु पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला. तिथे पोहोचल्यावर आरोपींना पकडण्याची नाकाबंदी किंवा दुसरे उपाय करण्याऐवजी पोलीस विक्रमची सखोल विचारपूस करीत राहिले. लुटमार झाल्याचा विश्वास बसल्यावर पोलिसांनी कारवाई केली.