नागपूर : कळंभा - काटोल रेल्वे क्रॉसिंग फाटकामुळे वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे. रेल्वेने या रोड ओव्हर ब्रिजवर नुकतेच दोन अवजड गर्डर लाँच केले आहे. त्यासाठी या मार्गाने होणारी वाहतूक अडीच तास बंद ठेवण्यात आली होती.
विविध शहरात आणि शहरांच्या बाहेर असलेल्या रेल्वे फाटकांमुळे (क्रॉसिंग गेट) नागरिकांची नेहमीच गैरसोय होते. दिवसभरात अनेकदा रेल्वे गाड्या जात येत असल्याने वारंवार क्रॉसिंग गेट बंद केले जाते. त्यामुळे गेटवर दोन्ही बाजुला शेकडो वाहनधारकांना ताटकळत राहावे लागते. पावसाळ्यात हा प्रकार वाहनधारकांना, खास करून दुचाकीचालकांना प्रचंड मनस्ताप देणारा ठरतो. रुग्ण घेऊन जाणारे तर या क्रॉसिंगवर अक्षरश: रडकुंडीला येतात. वेगवेगळ्या ठिकाणी दररोज हा प्रकार घडत असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्यात सर्वच रेल्वे क्रॉसिंग गेट (फाटक) नेहमीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठिकठिकाणचे क्रॉसिंग गेट बंद करण्यासाठी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल जवळ असेच एक गेट आहे. या गेटवर रेल्वे गाड्यांमुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो अन् वाहनधारकांनाही त्रास होतो. ते लक्षात घेऊन कळंभा काटोल मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेटला बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी या क्रॉसिंग गेटवर रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या पुलावर अत्यंत वजनी, अवजड असे २ लोखंडी गर्डर बसविण्याचे जिकरीचे काम २० ऑगस्टच्या रात्री सुरू करण्यात आले. त्यासाठी या मार्गावरची रेल्वे वाहतूक अडीच तास ब्लॉक करून हे काम पूर्ण करण्यात आले. पुलावर बसविण्यात आलेल्या प्रत्येक गर्डरची लांबी ४४.७० मीटर आहे.