नागपूर : आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय घेण्यात येतो, तरी २०२०-२१ या वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरता अर्ज सादर केला नाही. त्यांनी अर्ज सादर करावेत. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा व मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नयेत, म्हणून अद्यापही ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला नाही, त्यांनी कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज सादर करावा. जे विद्यार्थी २०२०-२१ मध्ये बारावी विज्ञान शाखेत होते; परंतु ज्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांनी सामायिक परीक्षेला (सी.ई.टी) बसण्याच्या पुराव्यासह अर्ज सादर करावा. तसेच एमबीए, एलएलबी, एमफार्म या अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा सीईटी परीक्षेला बसण्याच्या पुराव्यासह अर्ज सादर करावा.
सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज १ ऑगस्ट २०२१ पासून कार्यालयात स्वीकारणे सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून त्यांचे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी रोड या कार्यालयास सादर करावेत, असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सुरेंद्र पवार यांनी कळवले आहे.