कमलेश वानखेडे, नागपूर: रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनविण्याकरिता जात पडताळणी समितीकडे खोटे दस्तावेज सादर केले व वैधता प्रमाणपत्र मिळवले. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्रांची पुनःश्च तपासणी करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी तक्रार जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीची दखल घेत जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे यांनी रश्मी बर्वे यांना नोटीस जारी करीत २२ मार्च रोजी सकाळी ११ पर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले आहे.
वैशाली ईश्वरदास देविया ( टेकाडे कॉलोनी, पोस्ट -गोडेगांव टेकाडी, ता. पारशिवनी) यांनी या संबंधीची तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, बर्वे यांनी जात प्रमाणपत्रासाठी खोटे दस्ताऐवज तयार करुन आणि कोणतेही संबध नसलेल्या व्यक्तीला आपले सख्खे नातेवाईक (काका, वडीलांचे भाऊ) दाखवून दुसऱ्याच व्यक्तीचे कागदपत्रे जोडले आहेत. बर्वे यांचे कुटुंब जन्मताच हिंवरा, तालुका-पांढुर्णा, जिल्हा पांढुर्णा, मध्यप्रदेश येथील असून वडील सोमराज गणपत सोनेकर यांचे नावे मुत्यू प्रमाणपत्र तयार करण्याकरिता तहसलिदार नरखेड यांना खोटी माहीती पुरवून खोटे मुत्यू प्रमाणपत्र तयार करुन घेतले आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता लावलेले कागदपत्रे हे मनिचंद्र गणपतराव सोनेकर रा. मुर्ती, ता. काटोल, जिल्हा नागपूर येथील रहीवासी असून ते रश्मी बर्वे यांच्या वडीलांकडील कुटुंबातील रक्तनाते संबधातील नातेवाईक नाहीत. दस्तऐवजामध्ये घुलबा सोनेकर नावाचा दस्तावेज आहे, परंतु ते सुध्दा त्यांचे नातेवाईक नाहीत असेही वैशाली देविया यांनी तक्रारीत नमुद केले आहे. राज्य माहीती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त यांच्या आदेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल यांनी केलेल्या चौकशीचा अहवालही त्यांनी तक्रार अर्जासोबत जोडला आहे. या सर्व तक्रारीच्या अनुशंगाने जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण्देण्यास सांगितले आहे.
रामटेकचे तिकीट कापण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र : बर्वे
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळू नये, या ना त्या कारणावरून आपले तिकीट कटावे, यासाठी राजकीय विरोधकांनी आखलेले हे षडयंत्र असल्याचा आरोप रश्मी बर्वे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. बर्वे म्हणाल्या, मी चांभार (अनुसूडित जाती) जातीत जन्म घेतला ज्याचा मला अभिमान आहे. यापूर्वीही आपल्यावर जात पडताळणीसाठी खोटे कागदपत्र सादर केल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यावेळीही न्यायालयाने स्थगिती दिली होती. जात पडताळणी समितीची कुठलिही नोटीस मला मिळालेली नाही. मात्र, मिडियाच्या माध्यमातून मला तशी माहिती मिळाली. नोटीस मिळाल्यावर जात पडताळणी समिती कडे उत्तर सादर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचण्यात शक्ति वाया घालविण्यापेक्षा निवडणूक लढण्यात ताकद लावावी, असे आव्हानही त्यांनी दिले.