नागपूर : या देशातील जातीव्यवस्था, विषमता, लिंगभेद, असमानता ही महिलांच्या गुलामगिरीवर अवलंबून आहे. महिला ज्या दिवशी ही गुलामगिरी तोडून स्वतंत्र होतील, त्या दिवशी या देशातील हा सर्व भेदाभेद दूर होईल, असे रोखठोक प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा अॅड. वैशाली डोळस यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त नागरी जयंती समारोह समिती आणि डॉ. आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे वैचारिक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना समर्पित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी अध्यक्षस्थानी होते, तर मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे समन्वयक श्रीमंत शिवाजी कोकाटे प्रमुख अतिथी होते. अॅड. डोळस म्हणाल्या, या देशातील जातीव्यवस्था, विषमता टिकून राहावी म्हणूनच महिलांना येथील धर्मव्यवस्थेने गुलाम करून ठेवले आहे. त्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तेव्हा येथील सनातनी लोक खवळून उभे राहतात. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे महिलांमध्ये आज इतकी ऊर्जा आली आहे की, त्यांना देवसुद्धा घाबरायला लागले आहेत. आता जातीभेद राहिला नाही. महिलांनाही सन्मानाची वागणूक दिली जाते. परंतु शनिशिंगणापूरच्या विषयाने या देशातील भेदभाव पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी आपल्या भाषणात या देशातील धर्मव्यवस्थेमुळे बहुजनांचा विकास खुंटला आहे, तेव्हा देशातील बहुजनांनी धर्मव्यवस्था नाकारून विकासाची कास धरावी, असे आवाहनही केले. नागेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक डॉ. नीरज बोधी यांनी केले. संचालन डॉ. सुचित बागडे यांनी केले. दरम्यान अशोक स्वरस्वती यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)आज ‘अल्पसंख्यांक’ या विषयावर परिसंवाद ४१२ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर अल्पसंख्यांक या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात अ.भा. ख्रिश्चन परिषदेचे महासचिव डॉ. जॉन दयाल, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, इरफान अली इंजिनियर आणि प्रो. डॉ. दीपक कुमार प्रमुख वक्ते राहतील.
महिलांच्या गुलामगिरीवरच जातीव्यवस्था टिकून
By admin | Published: April 12, 2016 5:29 AM