लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झालेल्या दोन महिन्याच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करीत त्याला नवी दृष्टी देण्यास डॉक्टरांच्या चमूला यश आले. ओंकार पांडे त्या चिमुकल्याचे नाव. माधव नेत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओंकारच्या जन्म झाल्यानंतर साधारण महिन्यानंतर त्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आले. त्याला काहीच दिसत नव्हते. नेत्रालयात ओंकार दाखल होताच त्याची तपासणी करण्यात आली. डॉ. वरदा गोखले यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. अशीच शस्त्रक्रिया अद्वैत बारापात्रे या तीन महिन्याच्या बालकावरही करण्यात आली.या विषयी माहिती देताना मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान म्हणाले, जन्मानंतर बाळाला मोतीबिंदू होण्याचे दोन प्रकार आहेत. आई कुपोषित असेल तर आहारांमधून आवश्यक पोषक घटक बाळाला मिळत नाहीत. त्यामुळे डोळ्यांमध्ये हा दोष निर्माण होतो तर दुसऱ्या प्रकारामध्ये बाळाला जन्मजात ‘रुबेला सिन्ड्रोम’सारखे आजार असतात. या शिवाय, अनुवांशिकता व इतरही घटक यास कारणीभूत ठरतात. लहान मुलांमध्ये जन्मानंतर मोतीबिंदूचे प्रमाण वाढत आहे. मेडिकलमध्ये एक ते दीड महिन्याच्या बाळावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नागपुरात दोन महिन्याच्या बाळाला मोतीबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:10 PM