नागपूर : विपुल प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे रोपण करून ऑक्सिभारत अभियानाची सुरुवात कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पर्यावरणदिनी नागपुरातून केली. या अंतर्गत सर्वाधिक ऑक्सिजन देणारे पिंपळ, कडूलिंब, अशोका, लिली, जामून, तुळसी आणि अन्य झाडांचे विविध ठिकाणी रोपण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, ऑक्सिभारत हे राष्ट्रीय अभियान देशाच्या सर्वच राज्यांच्या विविध शहरातील बगीचे, शाळा, कॉलेज, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांवर व्यापारी मोठ्या प्रमाणात राबविणार आहे. मोठ्या प्रमाणात ‘स्मृति वन’ स्थापन करण्यात येणार आहे. व्यापारी दिवंगत लोकांच्या स्मृतिनिमित्त एकाचवेळी १०० पेक्षा जास्त झाडे लावतील आणि विकसित होईपर्यंत देखभाल करतील. लहान रोपटे वृक्षाचे स्वरूप घेतील. त्यामुळे पर्यावरण आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. देशाच्या अनेक भागात पाण्याचा स्तर कमी असल्याने झाडांना पाणी देण्यासाठी रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची सुरुवात करण्यात येणार आहे.
ऑक्सिभारत अभियानाचे संयोजक किशोर धाराशिवकर, राजकुमार गुप्ता, ज्योती अवस्थी म्हणाले, या अभियानात जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष लावण्यात येणार आहे. या अभियानात देशाच्या सर्वच राज्यांतील ४० हजारांपेक्षा जास्त व्यापारी संघटना जुळून संपूर्ण देशात वृक्षारोपणासाठी एक विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.