नागपूर : कत्तलीसाठी निर्दयपणे गोवंश डांबून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ गोवंशाच्या जनावरांची सुटका केली आहे.
सोनु शेख (रा. भाजी मंडी जुनी कामठी) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी १४ जून रोजी रात्रई ११.२० ते १५ जूनला रात्री १२.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी जुनी कामठी चौधरी मस्जीद मागे भाजी मंडी येथे धाड टाकली असता तेथे ३२ हजार रुपये किमतीची ७ गोवंशाची जनावरे निर्दयपणे बांधून डांबून ठेवण्यात आल्याचे दिसले. ही जनावरे सोनु शेख याची असल्याचे पोलिसांना समजले.
या गोवंशाची सुटका करून ते वर्धा मार्गावरील गोरक्षण समितीत पाठविण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे हवालदार भिमराव बांबल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी ठाण्यात आरोपी सोनु शेख विरुद्ध कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५, सहकलम ११ प्राणी क्रुरता अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपी सोनु शेखचा शोध घेत आहेत.