लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/केळवद : केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील भागेमाहरी शिवारात पाठलाग करून गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ट्रक व गुरे असा एकूण २२ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये भुरे बाबू खाॅ (५३), आसिम शम्मी खाॅ (२७) दाेघेही रा. सिहाेरा, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश, शब्बीर सलिम शेख (३३, रा. दमुआ, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश), माेहम्मद हकिम साेहेल हकिम (२२, रा. काजीकेम नगर, भाेपाळ, मध्य प्रदेश), युनूूस अब्दुल रहेमान उस्मान शेख, रा. भाेपाळ, मध्य प्रदेश व अब्दुल रहेमान उस्मान शेख , रा. पातूर, जिल्हा अकाेला यांचा समावेश आहे.
पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील बिहाडा फाटा (ता. सावनेर) येथे नाकाबंदी केली हाेती. त्यांनी नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एमपी-०४/एचई-१०२० क्रमांकाच्या ट्रकच्या चालकास थांबण्याची सूचना केली. मात्र, ट्रकचालकाचे वेग वाढवून पळ काढला. त्यामुहे पाेलिसांनी पाठलाग करून हा ट्रक भागेमाहरी (ता. सावनेर) येथील बसथांब्याजवळ अडविला व झडती घेतली.
त्या ट्रकमध्ये पाेलिसांना ५१ जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले. चाैकशी व कागदपत्रांच्या तपासणीअंती ती गुरांची अवैध वाहतूक असून, सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकमधील सहाही जणांना अटक केली. या कारवाईमध्ये १५ लाख रुपयांचा ट्रक आणि ७ लाख ६५ हजार रुपये किमतीची ५१ जनावरे असा एकूण २२ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. ट्रकमधील गुरांना नजीकच्या गाेशाळेत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.